>> दिलीप ठाकूर
प्रत्येक कलाकाराच्या कारकीर्दीची सुरुवात वेगळी असते. त्यातही तो कलाकार कोणत्या काळात अभिनय क्षेत्रात पाऊल टाकतो, तेव्हाचे वातावरण कसे आहे, संधी कशी आहे आणि त्यास कोणाचा सहवास लाभतो यावरही काही गोष्टी अवलंबून असतात.
सुहासिनी देशपांडे यांचा अभिनय क्षेत्रातील तब्बल सात दशकांचा प्रवास होता. पुणे शहरात 27 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचे निधन झाले.
सुहासिनी देशपांडे यांनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी कलाक्षेत्रात प्रवेश केला. त्या काळात पुणे शहर आणि परिसरात मनोरंजनाचे मेळे आयोजित केले जात आणि त्यात छोटी नाटिका, नृत्य, विविध रूपे, बहुरूपी होणे अशा लहानमोठय़ा गोष्टी असत आणि त्यात सहभाग घेण्याचा जसा आनंद मिळत असे तसेच जनसामान्य प्रेक्षकांकडूनही अशा मनोरंजनाला प्रतिसाद मिळत असे. सुहासिनी यांनी बहुरूपी व्यवस्था, कला झंकार नृत्य पार्टीच्या मेळ्यामधून नृत्यांगना म्हणून मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले आणि अशा अनेक गोष्टी साकारल्या. त्यात हौस हा प्रकार जास्त होता. त्यात त्या आनंदाने सहभाग घेत असतानाच आणि मोठे होत असतानाच श्रीमती लीला गांधी यांच्या समवेत त्यांनी नृत्याचे अनेक कार्यक्रम केले. त्या ग्रुप डान्सर असत, पण संधी महत्त्वाची होती. लीला गांधी पारंपरिक लोकनृत्य, लोककला, लावणी नृत्य यात विलक्षण माहीर. त्यांच्या सोबत वावरत असतानाच सुहासिनी देशपांडे यांनी अनेक चित्रपटांमधूनही नृत्य सहकलाकार म्हणून भूमिका केल्या. पुण्यातील डेक्कन, प्रभात, नवयुग यांसारख्या त्या काळातील चित्रपट स्टुडिओतील चित्रपटांतून त्या सहायक नृत्य कलाकार, तर कधी ज्युनियर आर्टिस्ट कलाकार म्हणून कार्यरत राहिल्या. चित्रपटसृष्टीत कार्यरत राहण्यास ते उपयुक्त ठरते. त्यानंतर त्यांना लहानमोठय़ा भूमिका मिळत राहिल्या. कधी एखादी खल छटा असणारीही भूमिका मिळत असे. त्यांनी जवळपास शंभरपेक्षा जास्त चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यात ‘मंगळसूत्र’, ‘हिरवा चुडा सुवासिनीचा’, ‘देवकीनंदन गोपाला’, ‘साखरसम्राट’, ‘वारसा लक्ष्मीचा’, ‘मानाचं कुंकू, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘आई शप्पथ’, ‘पुढचं पाऊल’, ‘आज झाले मुक्त मी, ‘गडबड घोटाळा’, ‘गड जेजुरी जेजुरी’, ‘माहेरचा आहेर’, ‘आम्ही दोघे राजाराणी’, ‘बाईसाहेब’, ‘मानाचा मुजरा’, त्याचप्रमाणे सई परांजपे यांच्या ‘कथा’, रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांमध्येदेखील त्यांनी भूमिका साकारल्या. रंगभूमीवर त्यांनी ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘रामनगरी’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘बेलभंडार’, ‘सूनबाई घर तुझंच आहे’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘चिरंजीव आईस’, ‘कुलकर्ण्यांचं स्थळ’, ‘सासूबाईंचं असंच असतं’, ‘लग्नाची बेडी’ अशा गाजलेल्या नाटकांत त्यांनी भूमिका साकारल्या. ‘भानगडीशिवाय पुढारी नाही, भानगडीशिवाय गाव नाही’, ‘सोळावं वर्ष धोक्याचं’, ‘एक तमाशा सुंदर’ या वगनाटय़ांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. तेव्हा त्यांना सुरुवातीच्या काळातील आपल्या अनुभवाचा उपयोग झाला. अलीकडच्या काळात पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकात त्यांनी भूमिका साकारली. नायिकेभोवतीच्या नृत्य कलाकार ते सकस वा विशेष भूमिकांचा चढता आलेख हे त्यांचे विशेष. कसलीही घाई न करता त्या वाटचाल करीत राहिल्या हे उल्लेखनीय. सर्वांना सांभाळून घेणे, सर्वांशी हसून बोलणे, नवीन गोष्टी शिकणे आणि मेहनत या गुणांवर त्यांनी यशस्वी वाटचाल केली. आपल्या वाटेला आलेली भूमिका लहान आहे की मोठी, यात अडकून पडण्यापेक्षा त्या व्यक्तिरेखेला न्याय देणे, दिग्दर्शकाला अपेक्षित काम करणे याला त्यांनी प्राधान्य दिले.
या वाटचालीत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यात विशेष म्हणजे 2015 साली त्यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने जयंतराव टिळक स्मृती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने 2022 या वर्षाच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.