Udgir crime news – महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी

राज्यात महिला सुरक्षेचा बोजवारा उडालेला आहे. बदलापूर, अंबरनाथ, मुंबई, कोल्हापूरनंतर अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मिंधे सरकार राजकीय शो बाजीमध्ये व्यस्त असल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था रामभरोसे असल्याचे दिसते. याचाच प्रत्यत उदगीर शहरातही आला असून भर दिवसा एका महिलेची विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सरफराज अहमद शेख (वय – 28, रा. चौबारा, उदगीर) याला बेड्या ठोकल्या असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नांदेड नाक्याजवळील हरकरे नगर येथे 32 वर्षीय महिला घरातील काम आटोपून उंबऱ्यात येऊन उभी राहिली होती. त्याचवेळी आरोपी सरफराज तिथे आला आणि त्याने महिलेच्या उजव्या दंडाला पकडून माझे तुझ्यावर प्रेम असल्याचे म्हणत तिचा विनयभंग केला आणि गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने आरडाओरड केल्याने आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत तिथून पळ काढला. याप्रकरणी महिलेने कुटुंबीयांसह उदगीर ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरोधात भादवि कलम 72, 382 प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.