Cyclone Alert – पावसाच्या तडाख्यानंतर आता गुजरातला चक्रीवादळाचा धोका! IMD चा अलर्ट जारी

मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आणि पुरामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच आता हवामान विभागाने गुजरातला दिलेल्या वादळाच्या इशाऱ्याने परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. ज्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तो आता अरबी समुद्रात दाखल होत आहे. यामुळे गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्रात तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 80 वर्षांतील हे असे वादळ आहे जे जमिनीवर निर्माण झाले आणि आता अरबी समुद्रात घोंगावत आहे, असे सांगण्यात येत आहे. तर ही एक अतिशय दुर्मिळ घटना आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

अरबी समुद्रात च्रकीवादळाची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 1964 नंतर अरबी समुद्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचे दुर्मिळ चक्रीवादळ असेल. जमिनीवर एक वातावरण निर्माण झालेले आणि त्यामुळे गुजरातमध्ये जोरदार पाऊस होत आहे. आता या हवामानामुळे अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होत आहे, यामुळे ही घटना दुर्मिळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

समुद्रातील उष्णता घेऊन आता या वातावरणाचे रुपांतर चक्रीवादळात होत आहे. आतापर्यंत हा कमी दाबाचा पट्टा सौराष्ट्र आणि कच्छवर होता. आता तो हळूहळू पश्चिमकडे सरकत आहे. पश्चिमेकडून दक्षिणेला सरकताना दिसत आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम हा कच्छ, सौराष्ट्र आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीला होणार आहे. यापूर्वी अशा प्रकारची हवामानाची दुर्मिळ स्थिती 1944, 1964 1976 ला बघायला मिळाली होती.