
घोडबंदर येथील गायमुख घाट ते कापूरबावडी या रस्त्यावरील खड्यांनी पुन्दा योंके वर काढले आहे. गेल्याच महिन्यात या रोडवरील खड्डे बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित प्राधिकरणाला दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्यातच टाकले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकताच बनवलेला गायमुख घाटाच्या रस्त्यावर अक्षरशः खडी पसरली आहे. तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने ठाण्यातील घोडबंदरचा प्रवास वाहनचालकांना गचके खातच करावा लागत आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. शहरात रस्त्यावरील खड्यांमुळे वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. घोडबंदर रोडवर सद्यस्थितीत मेट्रोचे काम सुरू असल्याने मेट्रोच्या कामाचे जे साहित्य रस्त्यावर ठेवण्यात आले आहे. त्याचा अडथळा होत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. घोडबंदर रोडवरील मानपाडा, माजिवडा, पातलीपाडा सेवा रस्ता, ओवळा, आनंदनगर, गायमुख या रस्त्यांवर पुन्हा खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
रस्त्यांची अवस्था मुंबई-गोवा महामार्गासारखी
घोडबंदर येथे असलेल्या गायमुख घाट महामार्गावरील रस्त्यांचे काम करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र हे दावे फोल ठरत असून परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे पूर्णपणे खडी, रेती वाहून गेलेल्या रस्त्यावरूनच वाहतूक सुरू आहे. घोडबंदर मार्गाची अवस्था मुंबई-गोवा महामार्गासारखी झाली असल्याची टीका वाहनचालक करीत आहेत.
प्राधिकरणाचे एकमेकांकडे बोट
घोडबंदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. याचबरोबर पनवेल जेएनपीटी, नाशिक, अहमदाबाद, राजस्थान या परराज्यात जाणारी अवजड वाहनेदेखील याच महामार्गावरून ये-जा करतात. हा महामार्ग सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सार्वजानिक बांधकाम, एमएसआरडीसी आणि काही प्रमाणात ठाणे महापालिकेची आहे. मात्र खड्डे भरणीसाठी प्राधिकरण एकमेकांकडे बोट दाखविण्यात धन्यता मानतात. दरम्यान, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वाहनचालकांना याचा फटका बसत आहे.
सध्याच्या घडीला या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे मास्टिक पद्धतीने भरले जात असून सततच्या पावसामुळे काही अडचणी येत आहेत. खड्डे बुजवण्याची प्रक्रिया निरंतर चालू ठेवणार असल्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.