बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारणाऱ्या पतीचा खून; पाचजणांना अटक

बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा पतीने जाब विचारल्याच्या कारणावरून सातजणांच्या टोळक्याने पतीला बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी पाचजणांना अटक केली. ही घटना 19 आणि 20 ऑगस्ट रोजी म्हाळुंगे येथील साई अमृत लॉज येथे घडली.

दीपक मधुकर जाधव (वय 25, रा. दिघी), दीपक सुभाष सोनवणे (वय 26, रा. म्हाळुंगे), तेजस सोपान गाढवे (वय 26), सचिन बालाजी चांदुरे (वय 33), अक्षय मारुती पाटील (वय 27,रा. चिखली) अशी अटक पाच आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार बंटी व गोल्या या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय महिलेने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या 28 वर्षीय पतीचा खून करण्यात आला.

फिर्यादी महिला व त्यांचे पती हे मुलांसह बाहेर जेवण्याकरिता जयदीप हॉटेल येथे गेले होते. यावेळी फिर्यादी यांचे पती बिल भरत असताना फिर्यादी या त्यांच्या मुलासह हॉटेलबाहेर थांबल्या होत्या. यावेळी दीपक सोनवणे व त्याचा मित्र हे दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादीच्या अंगावर एक चिठ्ठी फेकली. याचा जाब फिर्यादी यांच्या पतीने विचारला असता, आरोपींनी त्यांना तिथे मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीला आरोपींनी फोन करून साई लॉज येथे भेटण्यास बोलावले. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे पती मुलांसह साई लॉज येथे गेले असता, आरोपींनी संगनमत करून पतीला दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.