बनावट टेलिफोन एक्स्चेंजवर छापा; 3788 सिमकार्ड जप्त

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) कोंढव्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त केले आहे. छाप्यात ३ हजार 788 सिमकार्ड जप्त केली असून, वाय फाय आणि सिम्बॉक्स चालविण्यासाठी वापरातील औटना लॅपटॉपसह जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमकार्डचा साठा जप्त केल्यामुळे खळबळ उडाली असून, त्यादृष्टीने आणखी कसून तपास करण्यात येत आहे. नौशाद अहमद सिद्धीकी (वय 32, रा. कोंढवा) विरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

बेकायदेशीर सिमबॉक्सच्या मदतीने कोंढव्यात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाला 24 ऑगस्टला मिळाली होती. माहितीच्या आधारे दहशतवादविरोधी पथकाने कोंढव्यातील एम. ए. कॉम्प्लेक्स, मीठानगर याठिकाणी छापा टाकून अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा शोध घेतला. कारवाईत विविध कंपन्यांचे 7 सिमबॉक्स, 3 हजार 877 सिमकार्ड, 9 वायफाय राउंटर, सिमबॉक्स चालविण्यासाठी वापरण्यात येणारे अँटिना, सिमबॉक्स, इनव्हर्टर, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित अनधिकृत मागील टेलिफोन एक्सचेंज किती वर्षांपासून सुरू होते.

आरोपी नौशाद अहमद सिद्धीक हा पैसे कमविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर सिमबॉक्सच्या साहाय्याने अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवित होता. विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल हिदुस्थानी यंत्रणेला समजू न देण्यासाठी कोंढव्यामध्ये एक्सचेंज सुरू केले होते. आरोपीने दूरसंचार विभाग, भारत सरकार व मोबाईल कंपन्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एटीएस विभागाने दहशतवादी कृत्यास साहाय्य होईल असे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त केले. सरकारच्या टेलिफोन विभागाची भविष्यात होणाऱ्या आर्थिक फसवणुकीस प्रतिबंध केला आहे. आपल्या परिसरात असे अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्यास पोलीस अथवा एटीएसशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.