
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला. अत्यंत सुमार दर्जाचे काम केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच आज आपटेच्या कल्याण येथील घरावर संभाजी ब्रिगेडने धडक दिली. संतप्त कार्यकर्त्यांनी बंद दरवाजाला काळे फासत घरावर अंडी फोडली. ‘शिवद्रोही आपटे’ असे पोस्टर त्याच्या घरावर चिकटवून संताप व्यक्त केला.
राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शिल्पकारांना डावलून कल्याणचा नवखा शिल्पकार जयदीप आपटे याला काम देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्रीसोबतच त्याचे आरएसएसशी ‘कनेक्शन’ असल्यामुळेच त्याला काम मिळाल्याचा आरोप होत आहे. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि आपटे याने तकलादू काम केल्यामुळे अवघ्या आठ महिन्यांत शिवरायांचा पुतळा कोसळला आणि जयदीप फरार झाला. मात्र भ्रष्ट कामातील ‘कनेक्शन’ उघड होऊ नये यासाठी त्याला पळून जाण्यास मदत केली की कुणी गायब केला याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर 48 तास उलटले तरी आपटे सापडत नसल्याने संशय अधिकच बळावला आहे. आज या घटनेचा निषेध करण्यासाठी आपटेच्या घरावर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते धडकले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जयदीप आपटे याच्या दारावर ‘जयदीप आपटे शिवद्रोही’ असे पोस्टर चिटकवत त्यांच्या दारावर अंडी फोडली.
आपटेची पत्नी शहापूरातः पोलीसांनी केली चौकशी
आपटे फरार झाल्यानंतर स्थानिक बाजारपेठ पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या क्राइम ब्रँचचे पथक बुधवारी आपटे याच्या शोधासाठी कल्याणच्या घरी आले होते. मात्र घर बंद असल्याने ते माघारी परतले. आपटे याची सासूरवाडी शहापूरमध्ये आहे. शहापुरातील विद्यार्थी प्रिटिंग प्रेसचे श्रीरंग पटवर्धन हे जयदीप आपटे याचे मेहुणे आहेत. आपटेची पत्नी निशिगंधा, त्याची आई व मुलगी शहापुरात माहेरी आल्याचे कळताच कल्याण पोलिसांनी शहापुरातल्या विद्यार्थी प्रिटिंग प्रेसवर धडक दिली. यावेळी निशिगंधा आपटे यांना जयदीप आपटे कुठे आहेत, अशी विचारणा केली असता मी माहेरी येण्याआधी जयदीप याने मालवणला जात असल्याचे सांगितले होते एवढीच माहिती दिली. त्यामुळे आपटे गेला कुठे? हीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी आपटेच्या कोकणातील नातेवाईकांचे फोन
नंबर आणि पत्ते पत्नीकडून घेतले असल्याचे कळते.
.