शेळकेपाडा येथील अंगणवाडीत काम करणाऱ्या जयश्री कडाळी यांचा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने छळ केल्याचे उघड झाले आहे. कडाळी यांना मानसिक त्रास देऊन त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र कालांतराने त्या हजर होण्यास गेल्या असता बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने त्यांना मंत्रालयाचा रस्ता दाखवला. मंत्रालयात जाऊनही दाद न मिळाल्याने रिकाम्या हाताने गावाकडे परतणाऱ्या जयश्री कडाळी प्रचंड मानसिक तणावाखाली आल्या आणि त्यांचा विक्रोळी रेल्वे स्थानकावरच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी आधी त्यांचा मृतदेह पंचायत समितीत नेला, त्यानंतर मुरबाड पोलीस ठाण्यात नेऊन ठेवला.
मुरबाड तालुक्यातील शहरी भागात असणाऱ्या सुमारे 19 अंगणवाड्यांचा मुरबाड नगरपंचायत क्षेत्रात समावेश न करता त्या अंबरनाथ नगर परिषदेकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यापैकी शेळके पाडा येथील अंगणवाडीत कार्यरत असलेल्या जयश्री कडाळी यांचा बालविकास प्रकल्प अधिकारी अंबरनाथ यांनी क्षुल्लक कारणावरून मानसिक छळ करून त्यांना निलंबित केले. कालातंराने त्या हजर होण्यासाठी गेल्या असता त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी हजर करून न घेता मंत्रालयातून परवानगी आणण्यास सांगितले. प्रचंड तणावात असलेल्या कडाळी यांनी मंत्रालयात हेलपाटे मारले, परंतु तेथेही कोणी सहकार्य करत नसल्याने कडाळी रिकाम्या हाताने घरी परतत होत्या.
दोषींवर कारवाई करा; कुटुंबीयांची मागणी
प्रकल्प अधिकाऱ्यांच्या छळवणुकीमुळे हक्काची नोकरी जाण्याच्या विचाराने प्रचंड ताण वाढला आणि विक्रोळी रेल्वे स्थानकावरच त्या कोसळल्या. या घटनेत त्यांचा जागीच मत्यू झाला. त्यानंतर त्यांना डोंबिवली येथील रुग्णालयात नेण्यात आले. कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूस प्रकल्प अधिकारी एकमेव जबाबदार असल्याने त्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नातेवाईकांनी कडाळी यांचा मृतदेह मुरबाड पंचायत समितीच्या आवारात आणून ठेवला, परंतु तेथे कोणीही अधिकारी नसल्याने तो मृतदेह मुरबाड पोलीस ठाण्यात नेण्यात आला. त्यांनी सांगितले की मृतदेहाची हेळसांड करू नका. अगोदर अंत्यसंस्कार करून घ्या, नंतर रितसर तक्रार घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल.