मालवणच्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. पुतळा बनवण्यापूर्वी कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागते. या शिवपुतळय़ासाठी संचालनालयाने फक्त 6 फुटांचीच परवानगी दिली होती. मग नियम डावलून 35 फुटी पुतळा पुणी उभारला? असा सवाल कला संचालक डॉ. राजीव मिश्रा यांनी उपस्थित केला आहे. नौदलाने इतका उंच पुतळा उभारायला सांगितला याचीही कल्पना नसल्याचे त्यांची सांगितले.
शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेमध्ये कला संचालनालयाची कोणतीही चूक नाही, असे डॉ. मिश्रा यांनी स्पष्ट केले. 35 फुटांचा पुतळा उभारला जातोय याची कोणतीही कल्पना कला संचालनालयाला सरकारकडून देण्यात आली नाही, असे ते म्हणाले.
ब्राँझऐवजी स्टीलचा वापर करणार सांगितलेच नव्हते
डॉ. मिश्रा यांनी पुतळा उभारणीसाठी असलेल्या प्रक्रियेचीही माहिती दिली. आमच्यासमोर 6 फुटांचे क्ले मॉडल सादर करण्यात आले होते. 35 फुटांचा पुतळा असेल आणि त्यात स्टेनलेस वापरले जाईल हे पुणीही सांगितले नव्हते. इतका उंच पुतळा बनवला तर त्यात ब्रासचा वापर अधिक करायला हवा होता, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.
तज्ञांकडून बारकाईने तपासणीनंतरच परवानगी
कला संचालनालयाकडे पुतळय़ाचे क्ले मॉडेल सादर करावे लागते. त्या मॉडेल्सची शिल्प तज्ञांकडून बारकाईने तपासणी होते. ज्या महापुरुषाचा पुतळा आहे त्याचा इतिहास, ज्या आवेशातील पुतळा आहे त्या आवेशामध्ये व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव, पुतळय़ाची उंची, पुतळा महापुरुषासारखा दिसतोय की नाही याबाबत शिल्पतज्ञ तपासणी करतात. त्यानंतरच पुतळय़ाला परवानगी दिली जाते, अशी माहिती डॉ. मिश्रा यांनी दिली.
परवानगीनंतर सर्व जबाबदारी शिल्पकाराचीच
कोणताही पुतळा उभारताना चबुतरा बांधावा लागतो. त्या चबुतऱ्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदाकडून परवानगी घ्यावी लागते. पुतळा आणि चबुतऱ्याच्या बांधकामाची परवानगी मिळाल्यानंतर शिल्पकाराला तसे लेखी कळवले जाते. त्यानंतरची सर्व जबाबदारी शिल्पकाराची असते, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.
निकृष्ट वेल्डिंग, नटबोल्टचा वापर दुर्घटनेस कारणीभूत
प्रथमदर्शनी पाहिले तर मालवणातील शिवपुतळा तयार करताना शिल्पकाराने बरीच घाई केल्याचे दिसते. त्याने ब्राँझ न वापरता स्टील प्लेट्स टापून वेल्डिंग केले, वेल्डिंगही निकृष्ट दर्जाचे होते आणि जोडणीसाठी नटबोल्टचा वापर केला गेला. या हलगर्जीमुळेच पुतळा कोसळला असावा असा निष्कर्ष काढता येईल, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.