एकीकडे नापिकी, अवकाळी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना आता दुसरीकडे महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण शेतकऱ्यांहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. लाडकी बहीण, भाऊ योजना राबवणाऱ्या मिंधे सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला. मात्र आता ठोस शैक्षणिक धोरण राबवण्यात आणि विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन करण्यातही मिंधे सरकार फोल ठरल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, देशात विद्यार्थी आत्महत्येचा दर चार टक्क्यांनी अधिक असल्याचे उघड झाले असून मन की बातच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीही विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचेच दिसत आहे.
विद्यार्थी आत्महत्या ः हिंदुस्थानात वेगाने पसरणारी महामारी या शीर्षका अंतर्गत एक अहवाल वार्षिक आयसी3 परिषद आणि एक्स्पोमध्ये सादर करण्यात आला. एनसीआरबी अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीवर आधारित या अहवालात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानात एकूण आत्महत्या करण्याचा वार्षिक दर दोन टक्क्यांनी वाढला असून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर चार टक्क्यांनी वाढला आहे.
तसेच बऱ्याच घटनांची नोंद होत नसल्यामुळे प्रत्यक्ष आत्महत्येची संख्या यापेक्षा अधिक असू शकतेस, असेही अहवालात म्हटले आहे. आयसी 3 संस्था ही एक बिगर सरकारी संस्था असून जगभरातील शालेय शिक्षण संस्थांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचे काम करते. तसेच महाविद्यालयातील शिक्षक, समुपदेशक आणि प्रशासकांना मार्गदर्शन करण्याचेही काम संस्थेकडून केले जाते.
मुलांपेक्षा मुलींच्या अधिक आत्महत्या
गेल्या दशकभरात मुलांच्या आत्महत्येत 50 टक्क्यांची वाढ झाली असून मुलींच्या आत्महत्येत 61 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आत्महत्येत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
महाराष्ट्र आघाडीवर
विद्यार्थी आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर असून एकूण आत्महत्येच्या 14 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. त्यानंतर तामिळनाडू आणि इतर राज्यांचा क्रमांक लागतो.