हात लावीन तिथे सत्यानाश हीच मोदींची गॅरंटी! उद्धव ठाकरे यांचे जोरदार तडाखे

मालवणच्या राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्दय़ावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवला. मोदी यांच्या हस्तेच या पुतळ्याचे अनावरण झाले होते. पूर्वी दादा कोंडके यांचा सिनेमा होता, बोट लावीन तिथे गुदगुल्या…आता मोदी नवा काढताहेत, हात लावीन तिथे सत्यानाश. जिधर हाथ लगाऊंगा उधर सत्यानाश होना ही चाहिये, ये मोदी की गॅरंटी है, अशी बोचरी टीका करतानाच, अशा सडक्या गॅरंटय़ा आपल्याला नकोत’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे आणि सर्व शिवसैनिक काल राडा करायला मालवणात गेले नव्हते, पुतळा कोसळला त्याचा निषेध करायला गेले होते. महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला म्हणजे काय, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई उपनगर गणेशोत्सव समन्वय समितीने वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज सभा आयोजित केली होती. त्या सभेला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. गणपती मुर्तीच्या उंचीच्या मुद्दय़ाचा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी यावेळी मिंधे सरकारचा समाचार घेतला. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, अंधेरीचा राजा या मंडळांच्या गणेशमूर्ती बनवताना अत्यंत काळजीपूर्वक बनवल्या जातात. मूर्तीचा अवमान होणार नाही याची काळजी मंडळाचे कार्यकर्ते घेतात म्हणून उत्सवाला आनंदाची झालर असते. शाडूची मुर्ती हवी बोलले गेले म्हणून मूर्तीकारांना शाडूची मातीही देण्यास सुरुवात केली. अशी जबाबदारी आम्ही घेतो मग सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी का घेतली नाही असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. व्यासपीठावरील महाराजांचा पुतळा व महापुरुषांच्या प्रतिमांचे उदाहरण देतही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शरसंधान केले. हे पुतळे आणि प्रतिमा काय अशाच आणून ठेवलेल्या नाहीत, कार्यक्रमानंतर अडगळीत टाकायला…ती आमची दैवते आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही रस्त्यावरचे खड्डे अद्याप कायम असल्याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी यावेळी मिंधे सरकारवर टीका केली. मुंबई महानगरपालिकेत आणि राज्यात आपले सरकार होते तेव्हा गणपतीपूर्वी आपण रस्त्यांवरचे बहुतांश खड्डे बुजवायचो. आता मिंधे सरकारने खड्डे बुजवण्याची घोषणा करूनही रस्त्यावर खड्डे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मिंधे सरकारच्या कारभारालाच इतके खड्डे पडलेत की ते बुजणार कसे आणि कोण बुजवणार. मग उगाच काहीतरी पाहणीचे नाटक करायचे. कोकणात चाकरमानी गणपतीसाठी गावाला जाणार तेव्हा महामार्गावर किती खड्डे पडलेत ते बघायला यांना जाग आली अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान केले.

देशात सरकार आहे की नाही हेच कळत नाही

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी सणांची चळवळ केली आणि आपण चळवळीचा उत्सव केला, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी, आत्ताचा काळ आणि तेव्हाचा काळ यात थोडे साम्य असेल पण आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत का? असा सवाल उपस्थितांना केला. त्यावर सभागृहात नाही, असा प्रतिसाद घुमला. चळवळ उभी राहिली, स्वातंत्र्य मिळाले, पण आज देशात सरकार आहे की नाही हेच कळत नाही, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

टिळकांनी केले त्याच्या नेमके उलटे आज केले जातेय, असा आरोप करताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. टिळकांनी सर्व समाज एकत्र केले, आज समाजात आगी लावल्या जाताहेत. समाजासमाजात भिंती उभ्या करण्याचे काम केले जात आहे. तोडा-फोडा-राज्य करा ही इंग्रजांची निती आता भाजपवाले अवलंबत आहेत. मग आपण संदेश काय द्यायचा. नुसताच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा सवाल त्यांनी केला.  असे पुन्हा येणारे अनेक आहेत म्हणून काय आपण त्यांना परत आणतो, असे विचारत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही वेध घेतला.  गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला असे आपण म्हणतो. कारण गणपती आपल्या रक्षणासाठी येतात आणि आपल्याला बुद्धी देऊन जातात, सगळं मंगल करून जातात म्हणून आपण त्यांच्या आगमनाची वाट पाहत असतो, असे सांगत राज्यातील जनता आता महाविकास आघाडी सरकारची आतुरतेने वाट पाहतेय, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.

बदलापूर प्रकरणावरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी मिंधे सरकारचा समाचार घेतला. ते म्हणाले की, बदलापूरची ती शाळा भाजप आणि आरएसएसशीसंबंधित आहे असे म्हणतात. अजून त्याचा काही खुलासा झालेला नाही. तिथे पोलीस ठाण्यात खेटा घालूनही तक्रार घेतली जात नाही. तक्रार झाली तरी तपास होत नाही. त्यावरून उद्रेक झाला की आंदोलकांवर सरकार गुन्हे दाखल करते. तीच जागरूकता सरकारने अत्याचार करणाऱ्याविरुद्ध वेळीच गुन्हा दाखल करून का दाखवली नाही, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

n सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आयेंगे. आपल्या राष्ट्रपतींचे नावही द्रौपदी आहे. हा योगायोग आहे. आता राष्ट्रपती महोदया, तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

n पंतप्रधान मोदी उद्या येताहेत. मणिपूरमध्ये जे घडले त्यावर बोलायला त्यांना काही काळ जावा लागला. आता उद्या येताहेत तर बदलापूरवर बोलतील की न बोलतील, का बंगालबद्दल बोलतील हे उद्याच कळेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

देखाव्यांमधून महिला सुरक्षेचा संदेश द्या

गणपती मंडपांतील देखाव्यांमधून महिला सुरक्षेचा संदेश मंडळांनी द्यावा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोना काळात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना आपण मांडली होती. तीच संकल्पना आता माताभगिनींसाठी मांडा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  माझी माता, माझी बहीण, माझी मुलगी म्हणता याची जबाबदारी माझी आहे असे म्हणणारे आपण तिचे भाऊ असलो पाहिजे.  कारण ‘बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित’, ‘आई सुरक्षित तर घर सुरक्षित’आणि घरातील महिला सुरक्षित असेल तर आपण समाज सुरक्षित ठेवू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महापालिका आयुक्तांच्या डोक्यावर बसून मंडळांच्या समस्या गणपतीपूर्वी सोडवा

रस्त्यावर खड्डे आहेत. फुटलेल्या पाईपमधून सांडपाणी अंगावर पडते ते पडलेच नाही पाहिजे. खांबाला विजेची रोषणाई केल्याने येता-जाता शॉक बसू शकतो. अशा गणपती मंडळांच्या अनेक समस्या आहेत. महानगरपालिका आयुक्तांच्या डोक्यावर बसून या समस्या सोडवून घ्या, असे आदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.

विनोद घोसाळकर यांनी यावेळी समन्वय समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई,  शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, उपनेते पराग डाके, अरुण दुधवडकर, संजना घाडी, राजुल पटेल, शीतल देवरुखकर, संजय पोतनीस, मिलिंद नार्वेकर, रमेश कोरगावकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी, माजी आमदार विलास पोतनीस, आशीष चेंबूरकर आदी उपस्थित होते.

उत्सवासाठी पैसे देऊन फोटो लावायला सांगितला तर लाथ मारून हाकलून द्या

गणेशोत्सव मंडळांना मिंध्यांकडून पैसे दिले जात आहेत. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले की, मंडळांना पैसे दिले जात आहेत. देत असतील. कारण उत्सव चालू ठेवावा लागतो. पण त्यांना तुमचा आत्मा विकू नका, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. उत्सवासाठी कुणी पैसे देत असेल तर ठीक आहे, पण गणपतीच्या आधी माझा फोटो लावा सांगेल तर त्याला लाथ मारून हाकलून द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदीही म्हणाले होते की, लगता है उपरवालेनेही मुझे भेजा है. म्हणून काय उद्या त्यांची मूर्ती लावून पूजा आणि आरती करणार? असे सांगत, उत्सवामध्ये राजकारण येऊ देऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

बाळासाहेब असते तर म्हणाले असतेतंगडं तोडून ठेवा

शक्ती कायदा जरूर पाहिजे, पण आत्ताचा कायदाही तितकाच सक्षम आहे. पण कायदा अमलात आणणारे गुंडपुंड असतील तर योग्य नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाच्या वामन म्हात्रे यांना चपराक लगावली. नामोल्लेख न करता त्यांनी म्हात्रेंचा समाचार घेतला. तुझ्यावर अत्याचार झालाय का असे कोणत्या तोंडाने तो महिला पत्रकाराला बोलू शकतो. हेच बाळासाहेबांचे विचार आहेत का? हेच शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला शिकवलेय का? अत्याचार झाला तरी चालेल, पण महिलेशी उर्मटपणाने बोला हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज असते तर शिरच्छेदच केला असता. पण आता ते दिवस नाहीत, कायदा आहे. बाळासाहेब असते तर म्हणाले असते तंगडं तोडून ठेवा. म्हात्रेवर अजूनही पक्षाची कारवाई नाही आणि म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय, अरे गद्दारांनो, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

बाप्पा, महाराष्ट्रावरील संकटाचे विसर्जन करण्याची ताकद दे

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बाप्पाला साकडेही घातले. ते म्हणाले की, दोन-तीन महिन्यांत तिरपागडं सरकार आहे त्याचे विसर्जन करण्यासाठी मी गणपतीबाप्पाला साकडे घालतोय. गणपती बाप्पा, तू आम्हाला आता असा आशीर्वाद दे की देशावर तर आहे, पण महाराष्ट्रावर आलेले संकट जे गेली अडीच वर्षे बेकायदेशीरपणे राज्य करतेय त्याचे विसर्जन करण्याची ताकद आणि हिंमत आम्हाला दे.

राष्ट्रपतींनी वेळीच संवेदना व्यक्त केल्या असत्या तर पुढच्या घटना घडल्याच नसत्या

कोलकात्यातील रुग्णालयात झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, आता मी भयकंंपित झाले आहे. आता बस्स… आता आणखी नको. ही चांगली गोष्ट आहे. राष्ट्रपतींनाही संवेदना आहेत हे त्यानिमित्त का होईना सर्वांना कळले. पण मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या त्याच वेळी त्या बोलल्या असत्या तर पुढच्या घटना घडल्याच नसत्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अत्याचाराच्या घटना घडल्या की आपण अजून होऊ द्या, अजून होऊ द्या, असे मोजत बसतो का?आणि आत्ता बस, मला भीती वाटायलाच पाहिजे असे काही आहे काय? असा उद्विग्न सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

याला आत टाक रे…  साहेब, तुमचाच चेला आहे!

मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर फोनवरून अधिकाऱ्यांना झापले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी यावेळी अनिल कपूरच्या नायक चित्रपटाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, नायक चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री बनलेला अनिल कपूरसोबत एक टाईपरायटर घेऊन फिरायचा तसेच मिंध्यांचे होते. त्यांनीही सांगितले, याला आत टाक, त्याला आत टाक. पण टाईपरायटरवाला सांगतो, साहेब हा तुमचाच चेलाचपाटा आहे, कसा आत टाकायचा त्याला? अशी नुसतीच थोतांडे सुरू आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बंधने झुगारून उत्सव साजरा करा

कोरोनामध्ये सर्वांचे रक्षण व्हावे यासाठी आपण सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे बंद केली होती. वारीही झाली नव्हती. वारकऱ्यांनीही सरकारच्या सूचना ऐकल्या होत्या. म्हणून आपण महाराष्ट्राला वाचवू शकलो होतो. विघ्न दूर करायचे असेल तर गणपती बुद्धिदाता आहे, त्याच्याकडून थोडी बुद्धी मिंधे सरकारने घ्यायला हवी, नुसताच धांगडधिंगा घालू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार वेडीवाकडे बंधने आणत असेल तर ती झुगारून द्या, दणक्यात उत्सव साजरा करा, असे आवाहनही त्यांनी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले.

  • पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरून एकमेकांकडे बोटे दाखवता. महाराजांचा पुतळा पुणी केला तर नौदलाने केला. नौदल म्हणते पीडब्ल्यूडीने केला. पीडब्ल्यूडी म्हणते शिल्पकाराने केला, शिल्पकार म्हणतो याने केला त्याने केला. ही सर्व अंदाधुंदी चालू आहे.
  • मिंधे सरकारने गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची घोषणा करूनही रस्त्यावर खड्डे आहेत. मिंधे सरकारच्या कारभारालाच इतके खड्डे पडलेत की ते बुजणार कसे आणि कोण बुजवणार? मग उगाच काहीतरी पाहणीचे नाटक करायचे.

आम्हाला राज्य पाहिजे. तुम्ही मेलात तरी चालेल. दंगली झाल्या तरी चालतील, पण आम्ही सत्तेवर राहिलो पाहिजे हा नतद्रष्टपणा, या वृत्तीचे विसर्जन करण्यासाठी मी बाप्पाच्या उत्सवाची वाट पाहतोय. महाराष्ट्रावर बेकायदेशीररीत्या राज्य करणारे हे सरकार विसर्जित होऊ दे! – उद्धव ठाकरे