गोरेगावच्या मोतीलाल नगर 1, 2 आणि 3 चा पुनर्विकास कोर्टाच्या लाल फितीत अडकला असून आता महायुती सरकार हा प्रकल्प अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहे. याच्या निषेधार्थ आज रहिवाशांनी न्यायासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
महायुती सरकारकडून हा पुनर्विकास प्रकल्प अदानीच्या घशात घालण्याचा डाव आखत आहे. यातच रहिवाशांना कोर्टाकडून न्याय मिळत नाही. या पार्श्वभूमीवर मोतीलाल नगरातील रहिवाशांसाठी कार्यरत असलेल्या मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समिती, जनकल्याणकारी समिती, मोतीलाल नगर रहिवासी विकास संघ व मोतीलाल नगर कमर्शिअल असोसिएशन या समितींच्या माध्यमातून शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व समीर देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन मोतीलाल नगरातील लोकांच्या समस्या आणि कोर्टात येणाऱया अडचणींबद्दल चर्चा केली. यावेळी रहिवाशांच्या मागण्यांचे निवेदनही उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी माधवी राणे, संतोष परब, गौरव राणे, संजय पावले, मल्हारी भिसे, श्रीधर शेलार, अफझल चांदीवाला, वेणुगोपाल भटड, अलीम खान, शबाना ठाकूर, अता हुसेन फिदवी, लकालिदास, सल्लाउद्दीन खान, कल्पिता तावडे, विनोद माने, बाळा सोनावणे, राजेश बोवलेकर, विजय आयरे, मनीष पटेल, मुन्ना पाटील, अन्वर भाई, कादिर खचावा, माधुरी अहिरे, पौर्णिमा कानकोनकर, वानखेडे आदी रहिवासी उपस्थित होते.