रूटचे 33 वे शतक, इंग्लंड 7 बाद 358

इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज ज्यो रूटने ऑलिस्टर पुकच्या 33 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधताना 143 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर इंग्लडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर 7 बाद 358 अशी दमदार मजल मारली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अ‍ॅटकिन्सन 74 तर मॅथ्यू पॉट्स 20 धावांवर खेळत होता.

बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या या मालिकेत ओली पोपला श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि लंकन गोलंदाजांनी सनसनाटी सुरुवात केली. सलामीवीर डॅन लॉरेन्स अवघ्या 9 धावांवर बाद झाला तर कर्णधार पोपला एकच धाव करता आली. मात्र त्यानंतर ज्योने इंग्लिश फलंदाजीला आपल्या हातात घेतले. त्याने बेन डकेटसह (40) तिसऱ्या विकेटसाठी 40 धावांची मग हॅरी ब्रुकसह 48 धावांची आणि जॅमी स्मिथबरोबर 62 धावांची भागी रचत संघाला द्विशतकासमीप नेले.

6 बाद 208 अशा स्थितीत असलेल्या संघाला रुटने गस अ‍ॅटकिन्सनच्या साथीने मजबूत केले. दोघांनी सातव्या विकेटसाठी 92 धावांची भागी रचून संघाला त्रिशतकी मजल मारून दिली. 206 चेंडूंत 18 चौकारांसह 143 धावा केल्यानंतर रूट बाद झाला. आता तो इंग्लंडचा सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. आता फक्त सचिन, पॅलिस, पॉण्टिंग, संगक्कारा, द्रविड, गावसकर, लारा, युनूस खान आणि जयवर्धने हेच त्याच्या पुढे आहेत.