ईश्वरपुरात शिवसैनिकांनी नितेश राणेंना दाखविले काळे झेंडे

बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांना ईश्वरपुरात शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला. यावेळी संतप्त शिवसैनिक जाब विचारण्यासाठी विश्रामगृहाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख अभिजित पाटील आणि पेलिसांमध्ये बाचाबाची झाली.

आक्रोश मोर्चासाठी आज सकाळी नितेश राणे ईश्वरपूरमध्ये आले होते. ते शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

काल राजकोट किल्ल्यावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पाहणीसाठी गेले असता नारायण राणे व नितेश राणे यांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर आज नितेश राणे यांना ईश्वरपूरमध्ये काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांनी विश्रामगृहात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना रोखले. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तेथेच शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत राणे यांचा निषेध केला.

यावेळी जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, महिला जिल्हा संघटिका योजना पाटील, शहरप्रमुख उदयसिंह सरनोबत, पूजा सोनार, विवेक सांडगे, दिलीप शेखर, अर्जुन देशमुख, अतुल गुरव, सुमित कांबळे, फजल हवालदार, दिगंबर नाथगोसावी, कृष्णात पवार, बाबासाहेब खोत, दीपक वाघमारे, श्यामराव पाटील, अभिलाष नरसुडे, अनिल साठे, शशिकांत नगारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.