
हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्वात जास्त अब्जाधीश राहणारे शहर म्हणून बीजिंगकडे पाहिले जात होते. परंतु आता मुंबईने बीजिंगलाही मागे टाकले आहे. आशियात सर्वात जास्त अब्जाधीश लोक हे मुंबईत राहत असल्याची माहिती हुरुन इंडिया रिच लिस्ट-2024मधून समोर आली आहे.
चीनची राजधानी बीजिंगपेक्षाही मुंबईत जास्त अब्जाधीश राहत आहेत. गुरुवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. आशियातील 25 टक्के अब्जाधीश हे एकट्या मुंबईत राहत आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, मुंबई अब्जाधीश लोकांचे आवडते शहरसुद्धा आहे.
मुंबईनंतर नवी दिल्ली आणि हैदराबादला अब्जाधीश लोकांची पसंती आहे. मुंबईत 58 अब्जाधीश लोक राहतात. नवी दिल्लीत 18 अब्जाधीश राहत आहेत. चीनमधील अब्जावधी लोकांच्या संख्येत 25 टक्के घसरण झाली आहे. तर हिंदुस्थानातील अब्जाधीशांच्या संख्येत 29 टक्के वाढ झाली आहे.
शाहरुख खान पहिल्यांदाच यादीत
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 7300 कोटी रुपयांच्या संपत्तीसह शाहरुख पहिल्यांदा हुरुन इंडिया रिच लिस्ट-2024च्या यादीत दिसला आहे.