Latur News – तांदुळजा येथील जैन मंदिरातील दानपेटी व चांदीच्या मूर्तीची भर दुपारी चोरी

लातूर तालुक्यातील तांदूळजा येथील श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरातील दानपेटी व मूर्तीची चोरी झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12 ते 4 दरम्यान घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तांदुळजा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून काही अंतरावर मुरुड रोडवर शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. या मंदिरामध्ये दानपेटी व पंचधातूची मूर्ती जी मूर्ती दीड किलो चांदीने मडवलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ती मूर्ती व दानपेटीतील अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये चोरून घेऊन गेले. या प्रकरणी मुरुड पोलीस स्टेशन येथे मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष अमोल देवधारे यांनी चोरी झाल्याची कळवले असता घटनास्थळी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे व तांदुळजा बीट चे पोलीस हेड कॉन्स्टेबल नानासाहेब जाधव यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी दरवाज्याची कडी कोंडा तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. दानपेटी मंदिराच्या बाहेर परिसरात टाकून देऊन आतमधील रक्कम घेऊन पोबारा केला. लातूर येथील ठसे तज्ज्ञांच्या पथकास रात्री उशिरा पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत तज्ञांनी ठसे घेण्याचे काम करत घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत मुरुड पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार नानासाहेब जाधवर यांची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. चोरीच्या घटने बाबत जैन समाजातील सर्व भाविकांनी व गावकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रस्टचे सचिव राजेभाऊ अन्नदाते यांनी देवही असुरक्षित असल्याने खंत व्यक्त केली आहे.