महिलांवरील अत्याचारामुळे संपूर्ण मल्याळम चित्रपटसृष्टी हादरली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर अनेक कलाकारांनी आपली मते मांडली आहेत. तसेच अरोपींना कठोर शिक्षा करण्याचीही मागणी केली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांच्या स्थितीबाबत हेमा समितीच्या एका अहवालाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अहवालानंतर, अनेक अभिनेत्री आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाच्या घटना शेअर करत आहेत. त्यामुळे आता मल्याळम चित्रपटसृष्टी महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही? असे प्रश्न उरस्थित केले जात आहेत.
दरम्यान, असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA) चे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल आणि संपूर्ण असोसिएशननेही सामूहिक राजीनामा दिला आहे. दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री पार्वती हिने आता मोहनलाल आणि AMMA यांच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी उचललेले हे पाऊल भ्याडपणाचे असल्याचा पार्वतीने म्हटले आहे. जेव्हा मी यांच्या राजीनाम्याची बातमी ऐकली, तेव्हाच मला वाटलं ही एक पळपुटीवृत्ती आहे. त्यांना प्रसारमाध्यमांसमोर जबाबदार धरतानाच ते पदावरून पायउतार झाले. पळून जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला. त्यामुळे हा विषय घेऊन चर्चेला पुढे जाण्याची संपूर्ण जबाबदारी पुन्हा महिलांवर येऊन पडली आहे. या प्रश्नावर राज्य सरकार आणि इतर पक्षांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा पर्याय त्यांनी दाखवायला हवा होता, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
AMMA समिती आणि केरळ सरकारवर पार्वती कडाडल्या
अभिनेत्री पार्वतीने अभिनेते मोहनलाल यांच्या राजीनाम्यावरून अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. ‘ही तीच कार्यकारी समिती आहे जिने 2017 च्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपींचे पुन्हा स्वागत केले होते. ही तीच कार्यकारी समिती आहे जिने दावा केला होता की त्यांच्यावर आरोप सिद्ध होईपर्यंत अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसल्याचे म्हटले होते. महिलांच्या तक्रारीची फक्त एफआयआर नोंद करावी, अशी बेजबाबदारपणाची विधाने सरकारकडून केली जातात, असे पार्वती यावेळी म्हणाल्या.