गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार सुरू असून परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दरड कोसळल्याचेही समोर आले असून आतापर्यंत यात 35हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे 17,800 लोकं विस्थापित झाली आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक रहिवासी भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, वायुसेना आणि तटरक्षक दलाद्वारे बचाव मोहीम राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
बुधवारी सौराष्ट्रातील देवभूमी द्वारका, जामनगर, राजकोट आणि पोरबंदर सारख्या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. येथे 12 तासात 50 मिमी ते 200 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 185 मिमी पाऊस द्वारका जिल्ह्यातील भानवद तालुक्यात झाला. दुसरीकडे बडोदा शहरात पाऊस थांबला असला तरी विश्वामित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अनेक भाग अद्यापही जलमय आहेत. घरांवर आणि छतांवर अडकलेल्या लोकांना एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि वायुदलाच्या तीन तुकड्यांद्वारे बाहेर काढण्यात येत असून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
बचाव पथकाने गेल्या तीन दिवसात 17,800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात आतापर्यंत 41 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर 3 हजारांहून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.
दरम्यान, गांधीनगरमध्ये मंगळवारी 15, तर बुधवारी 4 अशा एकूण 19 जणांचा मृत्यू झाला. मोरबीमध्ये 4, तर राजकोटमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. यासह आणंद जिल्ह्यातील खोडाधी गावात 3, महिसागरमदील हरिपुरा गावात 2, अहमदाबादमधील धिंगरा आणि साणंद गावात प्रत्येकी दोन, तर खेडातील चित्रसर गावात एकाचा मृत्यू झाला.