बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य नाहीतर कृत्यांमुळे चर्चेत असतात. या महिनाभरात ते तलवारीने केक कापणं, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य यामुळे वादात राहिले आहेत. दरम्यान आता त्यांच्यासंदर्भातला आणखी एक व्हिडीओ समोर आला असून त्यात गायकवाड यांची गाडी चक्क त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी धूत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरून सध्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होत आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून तो व्हिडिओ पोस्ट केला असून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल केला आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील हा व्हिडीओ शेअर करत गायकवाड यांना धूधू धुतले आहे.
बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे. शिवसेनेसोबत गद्दारी केल्यानंतर गायकवाड यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ती सुरक्षा अद्यापही कायम आहे. दरम्यान त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाला आमदार महाशयांनी चक्क त्यांची गाडी धुवायला लावल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा पोलीस कर्मचारी नेमका कोण हे व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही मात्र आमदार गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकीच तो एक असावा असा अंदाज आहे. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद असलेली महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आया बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.