बदलापुरात एका 11 वर्षीय मुलीवर 35 वर्षीय नराधमाने बलात्कार केला आहे. यात पीडित मुलगी गरोदर राहिली असून नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बदलापूरमध्ये एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर बदलापूरमध्ये स्थानिक रहिवाशांनी आंदोलन केले होते. आता बदलापूरमध्ये एका 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. आरोपीचे नाव नागेश शिंदे उर्फ नरेश आहे.
पीडित मुलीचे वडिले एका कन्स्ट्रक्शन साईटवर वॉचमन म्हणून काम करत होते. याच साईटवर आरोपी नागेश शिंदे हा कंत्राटदार म्हणून काम करत होता. ही मुलगी मैत्रिणीला भेटून घरी जात होती. तेव्हा नागेश शिंदेना हिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
मुलगी घरी गेली आणि भितीपोटी तिने आई वडिलांना याबाबत काहीही सांगितले नाही. पण मुलीच्या पोटात दुखत होते, म्हणून तिच्या पालकांनी डॉक्टरला दाखवले. डॉक्टरांनी तिला पोटदुखीचे औषध दिले आणि घरी पाठवले. दुसऱ्या दिवशीही मुलीला त्रास झाला म्हणून तिला उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा पीडित मुलगी पाच आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले. मुलीची विचारपूस केली तेव्हा तिने सारी हकीगत सांगितली.
पीडित मुलीच्या पालकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत आरोपी नागेश शिंदेविरोधात तक्रार केली. आपल्याविरोधात तक्रार दाखल झाली हे कळताच नागेश फरार झाला. त्याने फोन करून पीडित मुलीच्या पालकांना तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. मुलीचे पालक मागे हटत नव्हते म्हणून त्यांच्या घरावरही त्याने हल्ला करवला.
पोलिसांनी तपास करून मोठ्या शिताफीने नागेश शिंदेला तेलंगणातून अटक केली. शिंदेला कोर्टात सादर केले असून त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.