जळगाव रेल्वे स्थानकावर एक मोठी घटना घडली आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला मालगाडीची धडक बसली. यावेळी ड्युटीवर असलेल्या RPF जवानाने महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी 27 ऑगस्टला सकाळी साडेआठच्या सुमारास एक महिला फलाट क्रमांक 2 वरून फलाट क्रमांक 3 वर जाण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी मुंबईहून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेनने महिलेला धडक दिली. वेगात असलेल्या ट्रेनने महिलेला इंजिनच्या दिशेने पाच ते सात फूट खेचले. ही घटना घडताना फलाटावर उपस्थित RPF चे जवान हिरालाल देवराम चौधरी यांनी महिलेच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाने महिलेचा जीव वाचला. मात्र महिला या अपघातात जखमी झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी आरपीएफ जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.