सर्वत्र दहीकाल्याचा आनंद लुटला जात असताना शहापुरातील भाजपचा नकली चेहरा समोर आला आहे. हंडीची सजावट करण्यासाठी हार, फुले आणि फुग्यांसह नकली नोटा लावल्याचे उघडकीस आल्यानंतर गोविंदांनी संताप व्यक्त केला आहे. केवळ शोमॅनशिप आणि मोठेपणा दाखवण्यासाठी शहापुरातील भाजपने या बनावट नोटांची सजावट केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
शहापुरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील खालचानाका ते पंडितनाका यादरम्यान विविध राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवानिमित्त चुरस लागलेली पाहायला मिळाली. यावेळी संतोष हॉटेलसमोर भाजपच्या वतीने सात थरांची दहीहंडी उभारली होती. ही हंडी फोडण्यासाठी सर्वच गोविंदा पथकांचे डोळे लागले होते. शहापुरातील जाणता राजा गोविंदा पथकाने हंडी फोडून 21 हजारांचे बक्षीस पटकावले. दरम्यान या पथकाने हंडी सोबत सजवण्यासाठी लावलेली फळे व पैसे लुटण्याचा प्रयत्न केला असता. मात्र त्या हंडीवर लावलेल्या पन्नास, शंभर, दोनशे आणि पाचशेच्या नोटा बनावट निघाल्याने गोविंदांचा चांगलाच हिरमोड झाला.
अतिउत्साही कार्यकर्त्यांचा कारनामा
भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हा कारनामा केला असून गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी बनावट नोटा लावल्या. खऱ्या नोटा पावसात भिजून खराब होऊ नये यासाठी नकली नोटा लावण्यात आल्या असल्याचे सांगत काही पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या या नकली मुखवट्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. गोविंदा पथकांची एकप्रकारे फसवणूक केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.