सिंधुदुर्ग, राजकोट व सर्जेकोट किल्ल्यासमोर महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; फडणवीसांना लाज वाटली पाहिजे! – संजय राऊत

मालवणात काल जे झाले ती गुंडागर्दी आहे. सिंधुदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट किल्ल्यासमोर भारतीय जनता पक्षाच्या गुडांनी महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे, असा वज्राघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. भाजप खासदार नारायण राणे यांनी एकेकाला घरात घुसून मारण्याची धमकी दिली. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले असून ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत. पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत. त्यांना संरक्षण देऊ शकले नाहीत. मालवणात खुलेआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला. शिवरायांच्या किल्ल्यासमोर पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न झाला. गृहमंत्री या गोष्टीचे समर्थन करताहेत. ही त्यांच्या बोलण्याची स्टाईल असल्याचे म्हणताहेत. मग आम्ही बोलतो तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल का करता? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार उद्ध्वस्त झाले. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती हे फक्त तोंडी लावायला आहे. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार, व्याभिचार आणि अनाचार केलेला आहे तेवढा कुणी केला नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्येही लाखो, कोटी रुपये खाल्ले. हेच पैसे निवडणुकीसाठी, खासकरून सिंधुदुर्गात वापरलेले आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.

1971 च्या बांगलादेश मुक्तीसंग्राम युद्धात शौर्य गाजवणारी आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली भाजपने पैसे खाल्ले. मुलुंडच्या नागड्या पोपटलालने 50 कोटींहून अधिक पैसे खाल्ले आणि गृहमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांनी आयएनएस विक्रांत घोटाळ्याची चौकशी बंद करण्याच्या फाईलवर सही केली. देश विकून खाल्लेल्यांवर काय विश्वास ठेवायचा, असेही राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात भाजपने केलेले कृत्य अधम आणि निच आहे. महाराज असते तर अशा लोकांचा कडेलोट केला असता. त्यामुळे आम्ही 1 तारखेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि इतर काँग्रेसचे नेते राज्यभर जोडे मारा आंदोलन करणार आहोत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

मालवणमध्ये झालेला प्रकार निर्लज्जपणाचा कळस आहे. पोलिसांना शिव्या घालता, कॉलर पकडला. हे सगळे पाहताना गृहमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. काय चालले आहे राज्यात? कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? राष्ट्रपती काय करताहेत? राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेची चिंता आहे. पण शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चालले आहे याच्या वेदना होत नाहीत, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि सरकारमधील लोकं नौदलावर ढकलत आहेत. नौदलाच्या असंख्य बोटी वर्षानुवर्ष समुद्रात आहेत. त्या गंजत नाहीत, बुडत नाहीत, पण समुद्रावरचा महाराजांचा पुतळा कोसळतो. 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे म्हणतात. गेट वे ऑफ इंडियाजवळचा पुतळा 1961 ला यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंच्या पुढाकाराने उभा राहिला. आजही तो अभिमानाने उभा आहे. शिवाजी पार्कवरही पुतळा असून तिथेही बाजुलाच चौपाटी आहे. वारा, लाटांचे धक्के पचवून हे पुतळे उभे आहेत. कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले. तसेच या सगळा टेंडरचा खेळ असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

राणेंवर हल्लाबोल

दरम्यान, नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा राज्य सरकार बनवत असल्याचे म्हटले. याचाही समाचार राऊत यांनी घेतला. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे फक्त उद्धव ठाकरे यांचे वडील नसून महाराष्ट्राचे बाप आहेत. बाळासाहेबांच्या पुतळ्यामुळे राणेंच्या पोटात दुखत असेल तर अफझलखानाप्रमाणे त्यांच्या पोटाचे ऑपरेशन करावे का? ज्यांनी तुम्हाला अन्नाला लावले, प्रतिष्ठा, मान-सन्मान दिला, महाराष्ट्र उभा केला,घडवला, मराठी माणसाला स्वाभिमान, अभिमान दिला, महाराष्ट्राला अस्मिता दिली, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर लढायला शिकवले त्या बाळासाहेबांच्या पुतळ्यासंदर्भात आपण प्रश्न निर्माण करता. इतकी नमक हरामी करणार असाल तर यासारखे दुर्दैव नाही, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)