
बंगळुरूतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कुऱ्हाडीने वार करत ही हत्या करण्यात आली असून रामकृष्ण असे मृताचे नाव आहे. विमानतळावर तो ट्रॉली ऑपरेटरचे काम करत होता.
विमानतळावर खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी रमेश यालाही अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. अनैतिक संबंधांतून ही हत्या झाल्याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.
बंगळुरू शहराचे नॉर्थ इस्ट डिव्हीजनच्या डीसीपींनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रमेश असे आरोपीचे नाव आहे. कॉलेज बॅगमध्ये धारधार शस्त्र घेऊन तो बीएटीसीच्या बसने विमानतळावर आला होता. बसमध्ये असल्याने त्याची बॅग स्कॅन झाली नव्हती. याच संधीचा फायदा उठवत रमेशने टर्मनिल 1 मधील पार्किग भागात असणाऱ्या शौचालयाजवळ रामकृष्णवर हल्ला केला आणि त्याचा निर्घृण खून केला.
रमेशने बॅगेतून आणलेल्या कुऱ्हाडीने रामकृष्ण याच्यावर एकामागोमाग एक सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रामकृष्णला प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. या हल्ल्यात रामकृष्णचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात रामकृष्ण याचा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
अनैतिक संबंधातून हत्या
दरम्यान, मयत रामकृष्ण याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय रमेश याला होता. रमेश योग्य संधीची वाट पाहत होता. रामकृष्ण विमानतळावर काम करत असल्याची माहिती त्याला मिळाली आणि त्याने तिथेच त्याला संपवण्याचा निश्चय केला. रागाच्या भरात त्याने विमानतळ गाठले आणि रामकृष्णवर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून केला.