गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे विभागाने खूशखबर दिली आहे. वांद्रे टर्मिनस ते मडगाव स्थानकांदरम्यान नवीन द्वि-साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवार (29 ऑगस्ट 2024 रोजी) दुपारी 13.25 वाजता बोरिवली रेल्वे स्थानकावरून या नव्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
ही नवीन ट्रेन 10115/10116 वांद्रे टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस ही मुंबईच्या पश्चिम उपनगरी क्षेत्र आणि मडगाव शहर यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रहिवाशांचा कोकण भागाशी थेट संपर्क होणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना या गाडीचा फायदा होणार आहे.
ही ट्रेन बोरिवली स्थानकावरून ट्रेन क्रमांक ०९१६७ बोरिवली-मडगाव स्पेशल म्हणून रवाना होईल . ही ट्रेन 29 ऑगस्ट 2024 रोजी बोरिवली येथून 13.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.00 वाजता मडगावला पोहोचेल . ती वसई रोड , भिवंडी रोड , पनवेल , रोहा , वीर , चिपळूण , रत्नागिरी , कणकवली , सिंधुदुर्ग , सावंतवाडी रोड , थिविम आणि करमाळी स्थानकावर थांबेल . ट्रेनमध्ये एसी 2- टायर , एसी 3- टायर , एसी 3- टायर (इकॉनॉमी) क्लास , स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील. उद्घाटन सेवेसाठी बुकिंग सर्व PRS काउंटरवर आणि IRCTC वेबसाइटवर खुले आहे.
गाडी क्रमांक १०११५/१०११६ वांद्रे टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
ट्रेन क्रमांक 10115 वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेसचे नियमित संचालन 04 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल . ही ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून दर बुधवार आणि शुक्रवारी 06:50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22:00 वाजता मडगावला पोहोचेल . त्याचप्रमाणे , ट्रेन क्रमांक 10116 मडगाव-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसचे नियमित संचालन 03 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल . ही ट्रेन मडगावहून दर मंगळवार आणि गुरुवारी 07:40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23:40 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल . ही गाडी बोरीवली , वसई रोड , भिवंडी रोड , पनवेल , रोहा , वीर , चिपळूण , रत्नागिरी , कणकवली , सिंधुदुर्ग , सावंतवाडी रोड , थिविम आणि करमाळी या स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल . यामध्ये एसी 2 टायर , एसी 3 टायर , एसी 3 टायर इकॉनॉमी , स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास जनरल कोच असतील .ट्रेन क्रमांक १०११५ साठी बुकिंग २९ ऑगस्ट २०२४ पासून सर्व पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.