मालवणच्या सिंधुदुर्ग राजकोटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना आहे. लोकहो, उपमुख्यमंत्री म्हणून या घटनेबद्दल मी हात जोडून जाहीर माफी मागतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काळजी घेऊ, असा शब्दही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बुधवारी लातूर जिल्ह्यात पोहोचली. अहमदपूर येथे यानिमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मालवण येथील राजकोटातील छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचा लाव्हा फुटला आहे. त्यामुळे भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी सपशेल हात जोडून माफी मागत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. झाल्या घटनेबद्दल आपण हात जोडून माफी मागत आहोत, असा प्रकार पुन्हा होणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
अजित पवारांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर डोक्यावर घेतला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सभा आटोपून अजित पवार बाहेर पडत असताना पुन्हा मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दादांच्या सभेत चोरट्यांची दिवाळी
अजित पवार यांच्या सभेत पाकीटमारांनी दिवाळीच केली. सभेसाठी आलेल्या अनेकांची पाकिटे, मोबाईल चोरट्यांनी पळवले. एका पत्रकाराच्या खिशाला ब्लेड मारून चोरट्यांनी पैसे चोरले.
मालवण येथील सिंधुदुर्ग राजकोटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मिंधे सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळला. अवघ्या महाराष्ट्रात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. मात्र त्याबद्दल कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दाखवून अजित पवार हारतुरे घेण्यात मश्गूल आहेत. अहमदपुरात अजित पवारांवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. क्रेनने भलामोठ्ठा हार घालण्यात आला.