>> वैश्विक, [email protected]
आपल्याकडे पावसाळा ऐन बहरात असतो त्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अवकाशी आविष्कारांनी पाऊस नसलेल्या युरोप, स्कॅण्डेनेव्हिया या पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील वरच्या अक्षांशावर असलेल्या देशातून पाहायला मिळतात. आपल्याकडे जसा 18/19 नोव्हेंबरला सिंह किंवा लिओ राशी समूहाच्या पार्श्वभूमीवर होणारा धूमकेतूच्या पिसाऱ्यातील सुटलेल्या द्रव्याचा वर्षा पाहायला मिळतो तसाच ययाती किंवा पर्सियस तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर दिसणारा ‘पर्सिडस’ उल्कावर्षाव मनोरम दिसतो. त्यासाठी शेकडो अवकाशप्रेमी आणि खगोल अभ्यासक, निरभ्र रात्री असतील अशा प्रदेशात जातात.
स्विफ्ट-टटल धूमकेतूमुळे घडणारा हा उल्कावर्षाव जुलैच्या मध्यापासून उत्तर गोलार्धातील देशात दिसायला सुरुवात होते. पर्सिड्स क्लाऊड म्हणजे ‘स्विफ्ट टटल’ या धूमकेतूच्या भ्रमणकक्षेच्या भागातून फिरणाऱ्या असंख्य दगडगोटय़ांचा समुचय. हा धूमकेतू आपल्या सूर्यमालेला दर 133 वर्षांनी भेद देतो. सर्वच धूमकेतूंप्रमाणे तो सूर्याच्या जवळ येऊ लागला की सौरऊर्जेमुळे त्याला ‘शेपूट’ फुटते. ती धूसर पताकेसारखी दिसते. म्हणूनच त्याला आपल्याकडच्या प्राचीन अभ्यासकांनी धूमकेतू असे नाव दिले. 1995मध्ये हा धूमकेतू आम्हीही पाहिला होता. 1862नंतरचे त्याचे ते दर्शन होते.
26 किलोमीटर व्यासाचा हा धूमकेतू. धूमकेतू चिनी खगोल अभ्यासकांनी सन 188मध्येही पाहिला असल्याचे म्हटले जाते. त्या वेळी धूमकेतूंना, ‘शोधका’चे नाव देण्याची पद्धत नव्हती. आधुनिक काळात 16 जुलै 1862च्या रात्री लेविस स्विफ्ट आणि 19 जुलै 1962च्या रात्री हॉरेस टटल अशा दोघांनी हा धूमकेतू नोंदला आणि त्याला या दोघांचे ‘स्विफ्ट-टटल’ असे नाव मिळाले. 1992मध्ये तो सौर मंडळाकडे पुन्हा येऊ लागला आणि 133 वर्षांनी परत स्पष्ट दिसू लागला.
3044मध्ये हा धूमकेतू पृथ्वीपासून अवाघ्या 13 ते 16 लाख किलोमीटर अंतरावर येईल तेव्हा कदाचित आपल्या ग्रहाला धोका संभवतो. परंतु तोपर्यंत भरीव प्रगती केलेले अवकाश विज्ञान त्याचा ‘मार्ग’सुद्धा बदलू शकेल. तोसुद्धा तो ग्रहमालेत दूरवर असताना. असा हा शेपूटवाला पाहुणा, जाताना जे ‘द्रव्य’ सोडून गेलाय ते त्यातले बरेच ययाती तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर एक ‘ढग’ होऊन रेंगाळतेय.
त्यामुळे दर वर्षी ठराविक काळात, या द्रव्यातील पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खेचले जाणारे, हजारो धूलिकण, छोटे-मोठे दगड यांचा रम्य वर्षाव दिसतो. यापैकी जे मोठे दगड असतात ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने आकर्षित होऊन पृथ्वीच्या वातावरणात शिरतात. तेव्हा या वातावरणाशी त्यांचं घर्षण होऊन, त्यांचं ज्वलन होतं आणि ते चमचमत कोसळताना दिसतात. इंग्लीशमध्ये त्यालाच अज्ञानातून ‘शूटिंग स्टार’ किंवा आपल्याकडे ‘तारा पडला’ असे म्हटले जाते. तारा सूर्याएवढा प्रचंड असतो एवढेच लक्षात ठेवायचे, मग जे ज्वलंत ‘दिवाळी’ निर्माण करते ते द्रव्य घातक असते का? बहुतेक नाहीच. कारण धूमकेतूच्या शेपटामधील अगदी मोठा ‘बोल्डर’ (दगड) पृथ्वीकडे झेपावला तरी तो जळूनच जातो. फक्त त्याचा तेजस्वी ‘फायरबॉल’ होतो. क्वचित कुठे त्याचा छोटा गाभा कोसळू शकतो. परंतु तो जंगलात किंवा समुद्रात पडण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे उल्कावर्षाव पाहायला शेकडो लोक गर्दी करतात.
गेल्या 11 ऑगस्टला ‘नासा’ने त्याचे शूटिंग स्टार्सचेच शूटिंग केले, फोटो काढले. धूमकेतूंचे असे अवशेष सौर संकुलाच्या जन्मकाळाचे प्रतिनिधित्व करतात. या वर्षी चंद्रप्रकाशाचा ‘त्रास’ नसल्याने रात्रभर ताशी 30 ते 100 उल्का पडलेल्या प्रेक्षकांनी पाहिल्या. विशेष म्हणजे आकाशात त्याच वेळी उत्तर धुवाकडून उमटणारे रंगीत ऑरोरा किंवा नॉर्दन लाइट्स सुंदर दिसत होते.
एकाच वेळी ‘अरोरा’ आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर हा उल्कांचा नृत्याविष्कार. एखाद्या कवीला काव्य स्फुरावे असा नैसर्गिक सोहळा. आपल्याकडे अरोरा किंवा उत्तर दक्षिण ध्रुव प्रदेशांच्या आसपास दिसतात. तशी रंगबेरंगी आभा दिसत नाही. गेल्या वर्षी सौरकणांच्या प्रचंड प्रमाणामुळे असे रंगविभ्रम आपल्याकडे हिमालयात लडाखमधल्या हॅनलेपर्यंत दिसले असे म्हणतात.
मात्र असा धुवीय प्रकाश आणि त्यात सौंदर्यात भर घालणारा उल्कावर्षाव! क्या बात है! निसर्गाच्या या निर्हेतुक आविष्काराला दाद द्यावी तेवढी थोडीच. किती भन्नाट योगायोग. आपल्याला मात्र दिसणारा सिंह राशीतला उल्कावर्षाव पाहण्यासाठी पावसाळा संपेपर्यंत थांबावे लागणार. नोव्हेंबरच्या 16 ते 18 या तारखांना रात्री असा उल्कावर्षाव दिसेल. पण ही पौर्णिमेनंतरच्या चतुर्थीची रात्र आहे. आकाश चंद्रप्रकाशाने उजळलेले असणार. तरीही पाहू काय दिसते ते!