गोव्यातील गणेशभक्तांसाठी गुड न्यूज
लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणरायाचे आगमन होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधीच गोवा सरकारने गणेशभक्तांना आनंदाची बातमी दिली. गोव्यात पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्तीवर सबसिडी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. कमीत कमी एक फूट उंच मातीच्या मूर्तीवर 200 रुपयांची सबसिडी सरकारकडून दिली जाणार आहे.
ऍपलच्या पहिल्या कॉम्प्युटरला 2.5 कोटींची बोली
नुकतेच ऍपल कंपनीच्या एका दुर्मीळ कॉम्प्युटरचा लिलाव झाला. 2.5 कोटी रुपयांहून अधिक किमतीला हा कॉम्प्युटर विकला गेला. कॉम्प्युटरचे नाव ऍपल – 1 आहे. हा कॉम्प्युटर 1976 साली स्टीव्ह जॉब्ज आणि स्टीव वोजनायक यांनी तयार केला होता. लिलावात त्याला अडीच कोटी रुपयांची बोली लागण्याची अनेक कारणे आहेत. हा कॉम्प्युटर ऍपलच्या सुरुवातीच्या दिवसांचे प्रतीक आहे. स्टीव्ह जॉब्ज आणि स्टीव वोजनायक यांनी तयार केलेला हा पहिला कॉम्प्युटर असून तो विकून दोघांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली होती. तेव्हापासून ऍपल कंपनीला ओळख मिळाली होती. त्या वेळी ऍपलने 200 कॉम्प्युटर बनवले होते.
नोकरी! सीआयएसएफमध्ये 1130 पदांसाठी भरती
बारावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलमध्ये 1130 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवार 31 ऑगस्टपासून 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षांपर्यंत असावे. सविस्तर माहिती सीआयएसएफच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजची आज वार्षिक बैठक
रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक बैठक (एजीएम) उद्या होणार आहे. ही कंपनीची 47वी वार्षिक बैठक असून या बैठकीत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे 35 लाख शेअरधारकांना संबोधित करतील. मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानंतर पहिलीच ही बैठक होत आहे.
अमेरिकेतील सीएटल विमानतळावर सायबर हल्ला
अमेरिकेतील सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायबर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे इंटरनेट, फोन, ई-मेल सेवेला फटका बसला आहे. सोमवारपासून या सेवा सुरू होण्यात अडचण येत आहे. सिएटल विमानतळावरील बॅगेज सार्ंटग सिस्टमुळे ही समस्या येत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या हल्ल्याचा तपास अधिकारी करत आहेत.
कमला हॅरिस यांना 200 कर्मचाऱ्यांचा पाठिंबा
अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार झटका बसला आहे. ट्रम्प यांच्या पार्टीशी जोडलेल्या 200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी डेमॉक्रटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पाठींबा देत असल्याची घोषणा केली. एक पत्र पाठवून त्यांनी हा पाठिंबा दर्शवला आहे.