निवडणूक आयोगाने हरयाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर तेथील राजकीय वातावरण तापत आहे. तसेच पक्षांतराच्या घटनाही वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर हरियाणा सरकारच्या स्पेशल पब्लिसिटी सेलचे माजी अध्यक्ष आणि हरियाणवी गायक जय भगवान मित्तल उर्फ रॉकी मित्तल यांनी बुधवारी अनोख्या पद्धतीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी रॉकी मित्तल यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. या पक्ष प्रवेशावेळी गायक रॉकी मित्तल यांनी राहुल गांधी यांच्यासाठी खास गाणे गायले. रॉकी मित्तल यांनी राहुल गांधींची माफी मागून पक्षात प्रवेश केला. त्यांनी मंचावर राहुल यांना उद्देशून गाणे गायले. या अनोख्या शैलीत काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “मुझे माफ करना राहुल मेरे भाई…भाजप नेते रॉकी मित्तल यांनी माफी मागत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.”
रॉकी मित्तल यांनी 1 ऑगस्ट रोजी भाजपला रामराम ठेकला होता. पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप मित्तल यांनी भाजपवर केला. मित्तल म्हणाले की, गेल्या 14 वर्षांत त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी 200 हून अधिक गाणी लिहिली आणि गायली. असे असूनही आपल्याला तुरुंगात टाकण्यात आले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.आपण काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात गाणी बनवली, पण त्यांनी माझ्याविरोधात कधीही तक्रार केली नाही. आता मला वाटते की, मी काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात गाणी बनवून खूप मोठी चूक केली आहे.