Yavatmal News – गॅस टँकरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग, पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

>>प्रसाद नायगावकर

अवैधरित्या गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीचा वडकी पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या प्रकरणी वडकी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून सुमारे 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आह. या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करणाऱ्या टोळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील गॅस स्टेशन वरून नागपूरकडे गॅस टँकर निघाला होता. यवतमाळ जिल्ह्यातील वडकी येथे दहेगाव फाट्यावरील विरतेजा ढाब्याच्या मागे मोकळ्या जागेत गॅस टँकरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग चे काम सुरू होते. गोपनीय माहितीच्या आधारे वडकी पोलिसांनी यावर छापा मारला. यावेळी गॅस टँकर (कॅप्सूल) मधून एकावेळी 4 सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता. गॅस चोरी करून जरी गॅस सिलेंडरमध्ये हे भामटे भरत असले तरी आपल्या ग्राहकांना सिलेंडरमध्ये गॅस कमी जाऊ नये याची दक्षता म्हणून त्यांनी दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे सुद्धा त्यांच्याजवळ होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये विरतेजा ढाबा चालक श्रवणकुमार याचा ही समावेश आहे. तसेच अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

या प्रकरणी वडकी पोलिसांनी एकूण 31 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून यात गॅस टँकर, मॅक्स पिकअप व्हॅन, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, 39 नग गॅसने भरलेले सिलेंडर, 25 नग व्यावसायिक रिकामे सिलेंडर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा गोरखधंदा गेल्या एक वर्षापासून सुरू होता. हा गोरखधंदा कंपनीच्या वरिष्ठांच्या मूक आशीर्वादाने सुरू असावा असे जाणकारांचे मत आहे. पोलिसांनी जर नीट तपास केला तर यात मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.