शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राजकोट किल्ल्यावर पाहणी करायला गेले होते. त्यावेळी भाजपच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी राजकोटवर राडा घातला. ”हा राडा म्हणजे भाजपचा बालिशपणा होता. सध्या श्रावण आहे म्हणून नाहीतर यांच्या खिशातून कोंबड्या देखील काढल्या आहेत. पण ही घाण आहे. कचऱ्याकडे लक्ष द्यायचं नसतं’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे व त्यांच्या चिल्ल्यापिल्यांना फटकारले. यावेळी भाजप सध्या महाराष्ट्रातील माणसांच्या अस्मितेला, आत्म्याला, स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतेय अशीही टीका त्यांनी केली.
”आज जे झालं तो भाजपचा बालिशपणा होता. आत त्यांचा तो बालिशपणा सगळ्यांसमोर आलेला आहे. खरंतर पाहायला गेलं तर स्थानिक खासदार इथे चार दिवसांनी आले. आमचे वैभव नाईक तत्काळ आले होते. त्यांनी जे केले ते उत्फुर्तपणे केलं. हे घडलं तेव्हा मी संभाजीनगरमध्ये होतो. आपण जाऊन पाहायला पाहिजे. चूक कुणाचीही असो, भ्रष्टाचारी पार्टीने भ्रष्टाचार केलेला असो तरी आपण माहाराजांची माफी मागितली पाहिजे. त्यासाठी आम्ही आलो”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”भाजपच्या राज्यात गेल्या दहा वर्षात पाहत आलोय. जे जे भाजपने काम केलंय त्याला गळती लागली आहे. असा एकही भाग उरला नाही ज्यात भाजपने भ्रष्टाचार केलेला नाही. मेट्रो असो, मिंधेंने केलेले महानगर पालिकेतले घोटाळे, रिव्हर फ्रंट असो, अयोध्येतील मंदिरात गळती लागली आहे. ज्या मंदिरासाठी शिवसैनिकांनी, कारसेवकांनी जीव दिले त्या मंदिरावर पाणी फिरवलं. त्या मंदिरात काय करून ठेवलं, संसद भवनातही पाणी गळतेय. पहिल्या पावसात तिथे इतके पाणी भरले की काही खासदार देखील तिथे अडकले. दिल्ली विमानतळाचं छत पडलं. रेल्वेचे रोज अपघात होतायत. गडकरी साहेब बोलतात आम्ही दररोज पाच किलोमीटरचा महामार्ग बांधतो. गडकरी साहेबांनी एकदा मुंबई गोवा महामार्ग बघायला हवा, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट आपटेंना कुणी दिले ते समोर आलंच पाहिजे, कुठलाही एक्सपिरियन्स नसताना त्यांना हे काम मिळालं. त्यांनी जो पुतळा बनवला ते महाराजच वाटत नव्हते. स्टॅच्यु ऑफ लिबर्टी गेली 138 वर्ष आहे तसं आहे. आणि हा पुतळा आठ महिन्यात पडला. हा आपटे फरार झाला कसा. भाजपने जसा बलात्कारी रेवण्णाला पळू दिलं होतं. तसं भाजपने याला पळून दिलं का? या घटनेने चीड आलीय. हे महाराष्ट्रातील माणसांच्या अस्मितेला, आत्म्याला, स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतायत. महामानव बाबासाहेबांचा पुतळा बांधतायत तिथेही असा भ्रष्टाचार करणार का? यांना संविधानावर, महाराष्ट्रावर, छत्रपती शिवरायांवर द्वेष आहे. म्हणूनच संभाजीनगरच्या विमानतळाला यांनी अजून छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव दिलेलं नाही. म्हणूनच मोदींनी त्याला परवानगी दिलेली नाहीए”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
”आजपासून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे. त्यांच्या मावळ्यांप्रमाणे जगायचं आहे. समोरून अब्दाली व औरंगजेब येतील. ईडी सीबीआय येतील. त्यांना डोळ्यात डोळे घालून सांगांयचं आहे की आमचा महाराष्ट्र तुमच्यासमोर झुकणार नाही. आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही, गरज लागली तर तुम्हालाच झुकवू, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले