आता पुरे झाले… या संपूर्ण घटनेनं मी निराश आणि भयकंपित! कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपतींची पहिली प्रतिक्रिया

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘बस आता पुरे झाले. या संपूर्ण घटनेनं मी निराश आणि भयकंपित झाली आहे’, असं द्रौपदी मुर्मू म्हणल्या.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, मुलींवरील असे अत्याचाराच्या घटना योग्य नाहीत. कोलकाता घटनेवर राष्ट्रपतींनी प्रतिक्रिया नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

देशातील महिलांवरील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांबाबत त्या म्हणाल्या की, ‘कोणताही सुसंस्कृत समाज मुली-बहिणींवर होणारे असे अत्याचार सहन करू शकत नाही. कोलकात्यात विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक या घटनेचा निषेध करताना अपराधी मात्र कुठे अन्य ठिकाणी फिरत होते. आता पुरे झाले. समाजाने प्रामाणिक बनण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे’.

काय आहे कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण?

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. ती विवस्त्र स्थितीत होती. तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये असंतोष वाढला आणि ते संपावर गेले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे. या प्रकरणाला वेग आला तेव्हा उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत सीबीआयला आतापर्यंतच्या तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यानंतर सीबीआयने कोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल केला.