महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा मालवणातील राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्राच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदारपणावर महाविकास आघाडी तुटून पडली आहे. आज ‘मातोश्री’ येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीवेळी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे-भाजप सरकारवर हल्ला चढवला. या सरकाराच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरला आहे, तो महाराष्ट्र सहन करणार नाही, अशा खणखणीत शब्दात उद्धव ठाकरे यांनी कडक इशारा दिला आहे.
शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असं सरकार म्हणत आहे, या अर्थ गुन्हा घडला आहे आणि सरकारला हे मान्य आहे. मग गुन्हेगार कोण? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान आले आणि त्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं म्हणजे पंतप्रधानांचा देखील संबंध आला आणि त्यावेळी त्यांनी जो कार्यक्रम केला होता तो पुरेसा बोलका आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आता सारं नौदलावर टाकलं जात आहे. पण मग आपलं नौदल एवढं पोकळ नाही. ते समुद्राच्या तुफानांशीच खेळत असतात. तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात. मग आता ही जबाबदारी नौदलावर टाकून हे मोकळे होणार आहेत का? असा सवाल ही उद्धव ठाकरेंनी केला.
तसेच पुतळा बनवणाऱ्या शिल्पकाराची बाजू आता समोर आली आहे त्यात म्हटलं आहे की ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली आणि तो शिल्पकार 24-25 वर्षांचा असून त्याला असा मोठा पुतळा बनवण्याचा अनुभव नसल्याचं देखील आता समजत आहे. समुद्र किनाऱ्यावर पुतळा बसवताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, वारे, समुद्राच्या लाटांचा काय परिणाम होणार अशी सगळी माहिती असणे आवश्यक असते. जर 300-400 वर्षांपूर्वी शिवरायांनी तिथे किल्ला बांधला, जो आजही व्यवस्थित आहे. मग हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं मग आता आपल्याला या तंत्रज्ञानाचा विसर पडला आहे का? असा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलं.
या सरकारची शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही प्रतिमा ही अधिक उघड होत चालली आहे. यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही, छत्रपतींबद्दल आदर नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. कोश्यारी राज्यपाल असताना देखील त्यांनी अपमान केला होता, तरी देखील त्यांना मोदी सरकारं हटवलं नव्हतं. म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह हा ठासून भरला आहे आणि तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
मालवणध्ये मोदी-शहांच्या दलालांनी आणि शिवद्रोह्यांनी मोर्चाचा रस्ता अडवला, आता जोडे मारा आंदोलन करणारच उद्धव ठाकरे यांचा घणाघात
सिंधुदुर्गमध्ये मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसापूर्वी कोसळला. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज मोर्चा काढला. पण मालवणच्या किल्ल्यावर हा मोर्चा नारायण राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संतप्त झाले. मातोश्री येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित होते. राज्यातील महायुती सरकारविरोधात आता मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महायुती सरकारला जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
एकूणच महाराष्ट्रात एक प्रकारची अस्वस्थता आहे. दिवसागणिक महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भ्रष्टाचार वाढतो आहे. काल परवा जे घडलं, आजपर्यंत कधीही घडलं नव्हतं. शिवछत्रपतींचा पुतळा हा समुद्रात कोसळला. एकूणच हे जे काही महाफुटीचं सरकार आहे, डबल इंजिन ट्रीपल इंजिन म्हणा… त्याला कितीही इंजिन लावा. यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे आणि कारभाराने किळस आणलेला आहे. या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी दोन-तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद पुकारला होता. मात्र कोर्टाच्या माध्यमातून त्यावरही बंदी आणण्यात आली. मालवणमध्ये जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रात कोसळला. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आता महाविकास आघाडीतर्फे जो मोर्चा काढण्यात आला, त्या मोर्चाच्या मध्ये मोदी-शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडवून बसलेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
जे कारण सांगितलं जातंय की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला, मुळात हे कारण अत्यंत निर्लज्जपणाचं कळस गाठणारं आहे. राज्यपाल कोश्यारी हे समुद्र किनारी राजभवनात राहत होते. त्यांनीही महाराजांचा अपमान केला होता. पण कधीतरी जोरदार वाऱ्याने राज्यपाल महोदयांची टोपी उडाली असं वाचनातही आलं नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी ‘जोडे मारो’ कार्यक्रम
हा पुतळा पडला कसा? त्या पलिकडे जाऊन जे गद्दार आहेत, नाव घेऊन बोलायचं तर केसरकर. ‘काही वाईट घडलं तर त्यातनं चांगलं घडेल कदाचित’, असं ते बोलाताहेत. हे संपूर्ण संतापजनक आहे. येत्या रविवारी दुपारी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आम्ही उभे राहणार आहोत. या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी ‘सरकारला जोडे मारो’ हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल. माझ्यासह पवारसाहेब, नाना पटोले असतील. तिन्ही पक्षाचे सर्वप्रमुख नेते असतील, त्याच प्रमाणे सर्व शिवप्रेमींनीही या सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.