छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाने पैसे खाल्ले याची ईडी चौकशी करा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच मंत्री दीपक केसकर यांनी असंवेदनशील विधान केले असून फडणवीसांनी त्यांना मंत्रालयाबाहेर जोड्यानं हाणलं पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.
आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. हे आता उघड झालेलं आहे. प्रख्यात शिल्पकार रामपुरे यांनी माहिती दिली की हा पुतळा पडला असेल तर तो फक्त भ्रष्टाचारामुळे. देशामध्ये इतके पुतळे उभे आहेत. अगदी कन्याकुमारीच्या समुद्रात असेल किंवा अमेरिकेच्या समुद्रात असेल. मुंबईच्या चौपट्यात आहे, रंकाळा तलावात आहे, पाण्यात असंख्य पुतळे आहेत, शिखरावर, पहाडावर आणि प्रतापगडावरही पुतळा आहे. प्रतापगडावर 120 ताशी किमी वेगाने वारे वाहतात. हे पुतळे जागच्या जागी आहे. 70-75 वर्षांपुर्वी पंडित नेहरुंनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. पण सिंधुदुर्ग किल्ल्यावर सात महिन्यांत एक पुतळा पडला. वाऱ्याने पुतळा पडला, पण त्याच वाऱ्याने नारळी, पोफळीची झाडं पडली नाहीत. त्या दिवशी झाडं पडली नाहित, लोकांच्या घरचे पत्र उडालेले नाहीत. जेव्हा वादळ येतं तेव्हा वृक्ष पडतात, लोकांची घरं उद्ध्वस्त होतात. तसे काही झाले नाही. फक्त पुतळा पडला. कारण पुतळा पोकळ होता, भ्रष्टाचाराने पोखरलेला चौथरा यात कोट्यवधी रुपये खाल्लेले आहेत. आणि यात काही बातम्या समोर येत आहेत. त्या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचे कनेक्शन आहे, हे मी सांगत नाही, हे बातम्या सांगत आहेत. यावर विद्यमान न्यायमुर्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून चौकशी झाली पाहिजे. या पुतळ्याच्या मागे शेकडो कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकार भ्रष्टाचार करत आहे. आणि याच पैश्यातून महाराष्ट्राच्या निवडणुका लढवणार आहात. याचा काय फक्त निषेध करायचा? गप्प बसायचं षंढासारखं? असेही संजय राऊत म्हणाले.
मालवणात निषेध मोर्चा
आज मालवणात निषेध मोर्चा निघतोय. आदित्य ठाकरे या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या मोर्चाला उपस्थित राहतील. पण हे आंदोलन संपणार नाही. मी स्वतः 30 तारखेला मालवणला जाणार आहोत. राज्यभरातून इथे लोक येत आहेत, कारण महाराष्ट्राच्या मनाला झालेली ही सर्वात मोठी जखम आहे. त्यामुळे हे निषेध हे तोकडे शब्द आहेत.
दीपक केसरकरांना बुटाने हाणा
दीपक केसरकरांना बुटाने हाणलं पाहिजे आणि लोक त्यांना मारतील. जर त्यांना वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल असं ते म्हणाले. ही मिंध्यांनी पोसलेली अफझल खानाची औलाद आहे. मी तर असे म्हणेन की बरं झालं ही घाण आमच्याकडून निघून गेली. अशा सडक्या विचारांची लोकं असून कसं काय त्यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात? असे लोक मंत्रिपदी आहेत. देवेंद्र फडणवीस हे सच्चे शिवभक्त असतील तर त्यांनी मंत्रालयासमोर केसरकरांना बुटाने हाणलं पाहिजे. पुतळा पडला हा शुभशकून आहे, यातून काहीतरी चांगलं घडेल, असे केसरकर म्हणाले. किती घाणेरड्या मनोवृत्तीची लोकं या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केली? हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे. हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झाले आहेत हे माहित नाही. हे मिंधे आणि त्यांची टोळी पोसण्याचे काम फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी केले होते. आणि पैसे खाण्यासाठी सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला. हा आरोप नाही सत्य आहे.
नारायण राणे यांना वेड लागलंय
नारायण राणे यांना वेड लागलं आहे. पुतळा पडणे आणि इमारत पडणे यात फरक आहे. मोरबीत पूल पडला लोक मेले त्यावर बोला एकदा. नारायण राणे हे खासदार आहेत, आपण एक मराठी माणूस आहात. तुम्ही तरी विचार करून बोला. कुणाचीही बाजू घेताय तुम्ही ? हे जर दुसऱ्या राज्यात झालं असतं तर हे आणि त्यांची मुलं नागडी नाचली असती थयथयाट करत. पण आज त्यांच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना भ्रष्टाचार झाला. नारायण राणे हे तिथले खासदार आहेत, ते जर खरे शिवभक्त असतील तर त्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं. तुम्ही धिक्कार केला पाहिजे याचा.
मुख्यमंत्र्यांच्या मुलाला विचारा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे ज्यांनी कोट्यवधी रुपये खाल्ले ते ठाणे कनेक्शन आहे. यात कंत्राटदार, शिल्पकार बेपत्ता आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला विचारा कुठे आहेत ते?
फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू
देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू आहेत. हा पुतळा राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवला आहे. या साठी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जबाबदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव त्यांचे शत्रू करू शकले नाहीत, औरंगजेब, अफझल खान करू शकला नाही. पण भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि देवेंद्र फडणवीसांची विकृत मनोवृत्ती यामुळे महाराष्ट्रात महाराजांना पराभव स्विकारावा लागला.
एसआयटी चौकशी नेमा
या प्रकरणी एसआयटी चौकशी नेमली पाहिजे. पण ही लोकं आपलेच लोक या समितीमध्ये बसवतात. हायकोर्टात अनेक लोस संघाचे आहेत. हायकोर्टाच्या न्यायमुर्तींकडून याची चौकशी करावी. आज मालवणात मोर्चा आहे, आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करतील. या मोर्चात महाविकास आघाडीचे नेतेही सामील होतील.
देशात डबल स्टॅण्डर्ड न्यायव्यवस्था
कोलकातामध्ये डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला म्हणून भाजपने पश्चिम बंगालमध्ये बंद पुकारला आहे. पण आम्ही जेव्हा बंद पुकारला तेव्हा आम्हाला रोखलं गेलं. कारण इथे मोदी-शहा सरकार चालवतात. इथेही असाच अत्याचार झाला पण आम्हाला रोखलं, पण पश्चिम बंगालमध्ये ममता दिदीचं सरकार आहे म्हणून रोखलं गेलं नाही. देशात डबल स्टॅण्डर्ड न्यायव्यवस्था सुरू आहे. मोदी-शहा हे देशात डबल स्टॅण्डर्ड न्यायव्यवस्था चालवत आहेत. ममदा दीदीच्या सरकारनं आरोपीला अटक केली आहे, तरी भाजप तिथल्या पोलिसांवर हल्ले करत आहेत. शाळा-कॉलेज बंद करत आहेत आणि सार्वजनिक मालमत्ता उद्ध्वस्त करत आहेत. हा कुठला न्याय आणि कुठला कायदा आहे.
ईडी भाजपची अतिरिक्त शाखा
के कविता या सहा महिने कारण नसताना तुरंगात राहिल्या. आम्हाला माहित होतं की आरोप खोटे आहेत. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी त्रास देण्यासाठी कविता, सिसोदिया यांना अटक करण्यात आली. ईडी ही भाजपची अतिरिक्त शाखा आहे. राज्यात आणि देशआत ईडीने निर्दोष लोकांना पकडलं आहे.
निवडणूक लढवण्यासाठी चार हजार कोटी रुपये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे किती पैसे खाल्ले याची ईडी चौकशी करा. कुठे गेले पैसे. हे मोठ मोठे लोक मॉरिशसच्या मार्गाने मनी लॉण्डरिंग करतात. आता ठाण्याचा नवीन मार्ग आलेला आहे. निवडणूक लढवण्यासाठी मिंधे गटाने चार हजार कोटी रुपये जमा केले आहेत असं मी ऐकलंय. हे पैसे कुठुन आले? याच चार हजार कोटी रुपयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 100 कोटी रुपये सुद्धा आहेत.