एका ज्वेलर्सने आपल्या मोलकरणीवर दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप केला. पण जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मालकाने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप या मोलकरणीने केला आहे. मुंबईत ही घटना घडली आहे.
मुंबईत एका 55 वर्षीय व्यक्तीचे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांच्या घरी एक 27 वर्षीय महिला मोलकरीण म्हणून काम करत होती. त्यांच्या घरातून 25 हजार रुपये रोख रक्कम आणि 90 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. मालकाच्या पत्नीने ही बाब आपल्या पतीला सांगितली आणि पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांना या प्रकरणी आधी मोलकरणीला ताब्यात घेतले. तेव्हा तिने धक्कादायक खुलासा केला.
मोलकरणीने 15 हजार रुपये चोरल्याचे कबुल केले, पण तिने आणखी एक धक्कादायक माहिती दिली. मालकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा खुलासा या महिलेने केला. 7 जुलै ते 18 जुलै दरम्यान मालकाने आपल्यावर बलात्कार केला, पण नोकरी जाईल या भितीने आपण कुठेच याची वाच्यता केली नसल्याचे या मोलकरणीने म्हटले. मालकाने आपल्यावर बलात्कार केल्यानंतर त्याने पैसे देऊ केले होते, आपण ते पैसे घ्यायला नकार दिला. इतकंच नाही तर माझ्या बॅगेत एक सोन्याचं लॉकेट जबरदस्तीने टाकलं असेही या मोलकरणीने पोलिसांना सांगितलं.
पोलिस जेव्हा आरोपी मालकाला अटक करायला गेले तेव्हा आरोपी तब्येतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला नोटीस बजावलीये आणि लवकरच अटक करणार असल्याचे सांगितले आहे.