प्रबोधन कुर्ला शाळेत अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या वतीने मुलींच्या संरक्षणाचे धडे देणाऱया सुविचारांची हंडी बांधण्यात आली. विशेष म्हणजे शाळेतील गोपिकांनी ही हंडी फोडली.
प्रबोधन कुर्ला शाळेतही दरवर्षी अशाच पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो, परंतु या वर्षी मुलींचे महत्त्व आणि त्यांचं संरक्षण सांगणाऱया सुविचारांची हंडी लावण्यात आली होती. विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच याविषयी माहिती देण्यात आली. तसेच मुलांनाही मुलींबद्दल आदर, त्यांचे संरक्षण याविषयी जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी या अनोख्या दहीहंडीत मोठय़ा उत्साहाने भाग घेतला. दहीहंडीच्या या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर आणि विश्वस्त शलाका कोरगावकर यांनी केले व त्यांचे विशेष मार्गदर्शन यासाठी लाभले.