पुतळा दुर्घटनेचे पाप नौदलावर ढकलण्याचा मिंधे सरकारचा आटापिटा; निर्लज्ज दावा… ताशी 45 कि.मी. वेगाच्या वाऱ्यामुळे अपघात

आज मालवणात महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा

सिंधुदुर्गाजवळील मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी कोसळला. त्या घटनेवरून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे आता पुतळा दुर्घटनेचे पाप नौदलावर ढकलण्याचा मिंधे सरकारचा आटापिटा सुरू आहे. नौदलानेच हा पुतळा उभारल्याचे सरकार म्हणत आहे. इतकेच नव्हे तर ही घटना नगण्य असल्याचे दर्शवून राजकोटवर पुन्हा 100 फुटी शिवपुतळा उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते त्याचे अनावरण करण्याच्या गमजाही सरकारचे मंत्री मारत आहेत. त्यावरूनही शिवप्रेमी आणि सामान्य जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी उद्या मालवणात जनआक्रोश मोर्चा काढून निषेध नोंदवणार आहे. या मोर्चात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री अशा मिंधे सरकारमधील प्रत्येकानेच या घटनेची जबाबदारी झटकून नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत तो पुतळा राज्य सरकारने नव्हे तर नौदलाने उभारला होता असे या मंत्र्यांकडून सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी या दुर्घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्यांनी शिवरायांचा तो पुतळा सरकारने नव्हे तर नौदलाने उभारला होता असे सांगत हात वर केले. आज मुख्यमंत्र्यांची री ओढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तो पुतळा नौदलाने उभारल्याचे सांगितले. कदाचित मालवणमध्ये वेगाने वारे वाहतात याचे आकलन शिल्पकाराला करता आले नसावे, असे सांगत आता सरकार नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी नवा पुतळा उभारेल, असेही फडणवीस म्हणाले. पुतळय़ाचे भग्न अवस्थेतील फोटो व्हायरल होत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा असे पह्टो व्हायरल करणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवणच्या राजकोटवर जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. नौदल दिनानिमित्त मालवणच्या राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा असे नौदल अधिकाऱ्यांचेच म्हणणे होते. त्यामुळे पुतळय़ाच्या संपूर्ण कामाची तसेच त्याची निगा राखण्याची जबाबदारी नौदलाकडे होती. समुद्रकिनारी हा पुतळा असल्याने त्याला गंज लागत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 ऑगस्ट रोजी पत्र लिहून ही बाब नौदलाच्या निदर्शनास आणून दिली होती, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज राजकोट येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच पाहणी करण्यासाठी आलेल्या नौदल अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी जवळच्याच शाळेत गोपनीय बैठकही घेतली. केसरकर यांनी त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवपुतळय़ाची जबाबदारी सरकारची नव्हे तर नौदलाची आहे असे सांगितले. झाले ते झाले, तो अपघात होता, आता शिवरायांचा 100 फूट उंच नवा पुतळा राजकोटवर उभारू, असे केसरकर यावेळी म्हणाले.

शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी मेसर्स आर्टिस्टरी कंपनीचे मालक व शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन एस. पाटील यांच्याविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 110, 125, 318, 3(5) आणि सार्वजनिक मालमत्ता अधिनियमाच्या कलम 3 अन्वये याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

 जयदीप आपटेच्या शिल्पावरील कमेंटवरून शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप

जयदीप आपटे याने 5 मे 2023 रोजी फेसबुकवर त्याने बनवलेल्या शिवरायांच्या पुतळय़ाचे छायाचित्र पोस्ट केले होते.  त्यात शिवरायांच्या कपाळावरील घावाची खूणही स्पष्ट दिसत होती. अफझलखानाचा वध केल्यानंतर त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवरायांवर तो घाव केला होता. आपटे याच्या त्या छायाचित्रावर आनंद सहस्रबुद्धे याने कमेंट केली आहे. ‘सुरेख, महाराजांच्या डोक्यावरच्या घावाची खूणही शिल्पात दिसतेय, मस्त!’ अशी ती सहस्रबुद्धे याची कमेंट आहे. आपटेची ती पोस्ट या कमेंटसह आता व्हायरल झाल्याने शिवप्रेमी आणखीनच भडकले आहेत. त्या व्हायरल पोस्टवर आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

भ्रष्टाचाराची पोलखोल करणार वैभव नाईक कोर्टात जाणार 

सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नऊ महिन्यांतच कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीतील मोठा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला. या संपूर्ण भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार वैभव नाईक कायदेशीर लढा देणार आहेत. या लढय़ात अॅड. असीम सरोदे निःशुल्क कायदेशीर मदत करणार आहेत. आमदार वैभव नाईक यांनी पुतळा उभारणीतील महायुतीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सगळे कायदेशीर मार्ग वापरून राजकोट किल्ल्यावरील प्रकाराला कारणीभूत असलेला भ्रष्टाचार उघड करणार आहे, असे  वैभव नाईक यांनी जाहीर केले आहे.

सिंधुदुर्गात संतप्त पडसाद; महाविकास आघाडीचे आंदोलन

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर कोकणवासीयांमध्ये प्रचंड संताप आहे. त्याचे पडसाद संपूर्ण सिंधुदुर्गात आज उमटले. महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळय़ाला आज शिवसैनिकांच्या वतीने दुग्धाभिषेक करत पुष्पहार अर्पण करण्यात आला.

अपघाताने आलेल्या सरकारचे कामकाजच अपघाती – वडेट्टीवार

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दीपक केसरकर यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच मोठा अपघात आहे, ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल, असे वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. बदलापूर अत्याचार, ठाणे शासकीय रुग्णालयात बालके मेली असे एक ना अनेक अपघात महाराष्ट्रात सुरू आहेत,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील जनता सरकार पाडून उत्तर देईल – अखिलेश

मालवणातील घटनेबद्दल महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या घटनेवरून फेसबुक पोस्ट करत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट महायुती सरकार पाडून याचे उत्तर देईल, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. भाजपने केलेले प्रत्येक बांधकाम भ्रष्टाचारामुळे ढासळते. सिंधुदुर्गाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते आणि तो पुतळा कोसळावा हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे अखिलेश यादव यांनी नमूद केले आहे.

वाऱ्याने झाडाची पानेही पडली नाहीत…पुतळा कसा कोसळला?

वाऱ्याने झाडाची चार पाने पण पडलेली नाहीत. मग पुतळा कोसळतोच कसा, असा उद्विग्न सवाल यावेळी एका ग्रामस्थाने केला. कोसळलेल्या पुतळय़ाची दुरवस्था बघवत नाही म्हणून आम्ही त्यावर ताडपत्री टाकून तो झाकला आहे, असे सांगतानाच, स्थानिकांना विश्वासात घेऊन व सर्वांची मदत घेऊन लवकरच महाराजांचा पुतळा पुन्हा इथे उभारावा, अशी विनंती त्या ग्रामस्थाने यावेळी केली.

महाविकास आघाडीचा आज मालवणात जनआक्रोश मोर्चा

शिवपुतळा दुर्घटनाप्रकरणी कोकणात ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे आंदोलन सुरू असून उद्या मालवण येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढला जाणार आहे. शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सहसंपर्कप्रमुख संजय पडते यांनी ही माहिती दिली. सकाळी 10 वाजता मालवणच्या भरड नाक्यावरून या मोर्चाला सुरुवात होईल.

तोडफोडप्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे संतप्त झालेले शिवसेना आमदार वैभव नाईक आणि शिवसैनिकांनी सोमवारी मालवणातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा वैभव नाईक, शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि मंदार केणी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंते याप्रकरणी तपास करत आहेत.

कंत्राट दिले त्याची गुणवत्ता का तपासली नाही? –  मिटकरी

खरा मावळा शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे फोटो व्हायरल करणार नाही असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतरही अजित पवार गटाचे प्रवत्ते आमदार अमोल मिटकरी यांनी पुतळ्याचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. शिल्पकाराला कंत्राट देताना त्याची गुणवत्ता का तपासली नाही असा सवाल करत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महायुतीत या घटनेवरून मतभेद असल्याचे उघड झाले आहे.

राज्यावर आणि केंद्रावर गुन्हे दाखल करा  – नाना पटोले

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणे ही तर भारतीय जनता पक्षाची मानसिकताच आहे अशी टीका करताना, मालवणच्या राजकोटवरील शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोघांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

ही घटना महाराष्ट्राला काळिमा लावणारी असून शासनाने याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी नेमावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे. अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल, अशा इशारा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी दिला.

मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे  सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी एरीया कोस्टल सिक्युरिटी ऑफिसर कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र लिहून राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाबाबतच्या वस्तुस्थितीची जाणीव या घटनेपूर्वीच करून दिली होती. जून महिन्यात पुतळय़ाची डागडुजी करण्यात आली होती. डागडुजी करूनही पुतळा विद्रूप दिसत असून पुतळय़ाचे नटबोल्ट निघाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.

नौदलाने केली पाहणी

नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून आज दुर्घटनास्थळी पाहणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व फॉरेन्सिक टीमही त्यांच्यासोबत होती. जवळपास दीड तास हे पथक राजकोट येथे होते. पुतळा कोसळण्याचे नेमके कारण काय होते याचा तपास नौदल करणार आहे. नौदलाने एक समितीही स्थापन केली असून ही समिती घटनेचा पूर्ण तपशील तपासून अहवाल देणार आहे, असे सांगण्यात आले.

मालवणात पहिल्यांदाच वारा आला काय?

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मालवणमधील घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची आज खिल्ली उडवली. ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याने राजकोटवरील शिवपुतळा कोसळला असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावर, मालवणमध्ये काय पहिल्यांदा वारे वाहिले का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. घटनाबाह्य मुख्यमंत्री खोटारडे होते हे आम्हाला माहीत होते. आता ते जगजाहीर झाले, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या उभारणीतही भ्रष्टाचार करावासा वाटला हे दुर्दैव आहे. काल बदलापूरमधील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. आज पुतळा कोसळला. या गोष्टी जनतेने विसरता कामा नये, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पुतळा बनवणारे शिल्पकार कोण होते, शिल्पकारावर गुन्हा नोंदवला तर त्याला अटक झाली का, ते कुणाचे मित्र आहेत का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

हा पुतळा नौदलाने उभारला होता. ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्यानेच पुतळा कोसळला. नवा पुतळा उभारण्याचे काम लवकरच हाती घेऊ.

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुतळा नौदलानेच उभारला होता. मालवणमध्ये वेगाने वारे वाहतात याचे आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. नौदलाच्या मदतीने त्याच ठिकाणी नवा पुतळा उभारू.

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समुद्राची खारी हवा बसल्याने डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला. पुतळ्याची निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती. नौदलाला 20 ऑगस्टला पत्रही दिले होते.

– बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

तो अपघात होता, नवा पुतळा उभारू

शिवपुतळ्याची जबाबदारी सरकारची नव्हे, तर नौदलाची आहे. झाले ते झाले, तो अपघात होता. आता शिवरायांचा 100 फूट उंच नवा पुतळा राजकोटवर उभारू आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करू, अशा गावगजाली शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.

शेणात पायताण बुडवून तुमचे तोंड रंगवू; संतप्त शिवप्रेमींचा केसरकरांवर हल्ला

वाईटातून काहीतरी चांगले घडायचे असेल म्हणून शिवपुतळा कोसळण्याचा हा अपघात घडला असावा अशा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विधानाचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे. महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान करणार असाल तर शिवप्रेमी शेणात पायताण बुडवून तुमचे तोंड रंगवतील, असा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवप्रेमींनी दिला. हा अव्वल दर्जाचा निर्लज्जपणा आहे, असा संतापही शिवप्रेमींनी व्यक्त केला.