
राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकारांकडून निविदा मागवायला हव्या होत्या. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ मुख्यमंत्र्यांचे पुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे कल्याणच्या जयदीप आपटे या अवघ्या तिशीतील नवख्या शिल्पकाराला पुतळ्याचे काम देण्यात आले. मात्र पाच-दहा फुटांचे शिल्प बनवणाऱ्या जयदीपला शिवरायांचा 28 फुटांचा भव्यदिव्य पुतळा तयार करणे झेपले नाही. त्यामुळे पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. तमाम शिवप्रेमींची मने श्रीकांत शिंदेंच्या मित्राच्या ‘कर्तृत्वा’मुळे दुखावली असून सोशल मीडियात या भ्रष्ट मैत्रीची पोलखोल करणारे मेसेज आज व्हायरल झाले.
मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर कोण हा जयदीप आपटे, याचीच चर्चा सुरू झाली आहे. त्याचे नाव कुणी सुचवले, निवड कुणी आणि कशी केली, असा संताप व्यक्त होत आहे. या पुतळा प्रकरणात खासदार श्रीकांत शिंदे यांचे कनेक्शन समोर आले आहे. मोठे पुतळे किंवा शिल्प बनवण्याचा कोणताही अनुभव नसताना जयदीप आपटे याला थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुतळा तयार करण्याचे काम केवळ श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहामुळे दिल्याची माहिती आता समोर आली आहे. जयदीप आपटे याने राजकोट येथील शिवरायांचे 28 फूट उंच शिल्प घडवण्याआधी फक्त बोटावर मोजता येतील इतकेच पुतळे बनवले होते. तेसुद्धा दीड, तीन, पाच, दहा फूट उंचीचे. त्यामुळे जयदीप आपटे यांना पुतळा उभारण्याचे काम श्रीकांत शिंदे यांच्या शिफारशीने झाल्याचा आरोप होत आहे. शिंदे यांच्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौदलानेही यामध्ये हस्तक्षेप केला नसल्याचे समजते.
शिल्पकार आपटेला नौदलापर्यंत कोणी पोहोचवले; खुलासा करा- सतेज पाटील
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणारे शिल्पकार जयदीप आपटे यांना नौदलापर्यंत कोणी पोहोचवले याचा खुलासा राज्य शासनाने करावा, अशी मागणी काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी आज केली. सतेज पाटील यांनी आज राजकोट येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेला महायुती सरकार जबाबदार असून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.
फादर ऑफ नेव्ही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. पण आज त्यांच्या पुतळय़ाची अवस्था बघितल्यानंतर प्रचंड दुःख झाले, संतापही तितकाच आहे. पुतळा उभारताना त्यानंतरही योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही हे सर्व प्रक्रिया बघल्यानंतर लक्षात येते, असे सतेज पाटील म्हणाले.
नौदलावर खापर फोडून अपमान करू नका
या घटनेचे खापर नौदलावर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारवर सतेज पाटील यांनी यावेळी टीका केली. ते म्हणाले की, देशामध्ये आपल्या नौदलाचा एक वेगळा इतिहास आहे. ‘आयएनएस विक्रांत’सारख्या बोटी बनवण्याची ख्याती असलेले नौदल आहे. शासनाने स्वतःचे पाप लपवण्यासाठी याचे खापर नौदलावर पह्डणे म्हणजे नौदलाचा अपमान केल्यासारखे आहे, असे ते म्हणाले.
नौदलाने निविदा काढल्यानंतर त्याला किती लोकांनी प्रतिसाद दिला? आपटे नावाच्या व्यक्तीला कोणी नेमलं? कारण नौदल हे यापेक्षाही चांगले काम करू शकते. पण आपटे यांना काम द्या असे नौदलाला कोणी सांगितले हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे, असेही पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. इतकी वर्षे नौदलाच्या माध्यमातून या देशाचे संरक्षण केले जात आहे. त्यांना बदनाम करण्याचे काम कृपा करून राज्य शासनाने करू नये अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
हा पुतळा बनवण्यासाठी अडीच ते तीन वर्षे लागणार होती. समुद्री वारे, जमिनीचा थर, वातावरण याचा अभ्यास महत्त्वाचा होता. मात्र यात सर्वात शिल्पकाराचे ज्ञान तोकडे पडले. सहा महिन्यांच्या आत पुतळा तयार झाला. शिवाय लोकसभा निवडणुकीत मतांवर डोळा ठेवून सरकारनेही याकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीत पुतळ्याचे उद्घाटन केले.