
ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमच्या ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील कारकीर्दीचा शेवट कडू झाला. 2020 मधील चॅम्पियन डॉमिनिकला यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. यजमान अमेरिकेच्या बेन शेल्टॉनने त्याचा पराभव केला.
डॉमिनिक थिएमने 2020 च्या अमेरिकन खुल्या स्पर्धेतील अंतिम फेरीत दोन सेट्सनी पिछाडीवर पडल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करीत अलेक्झांडर ज्वेरेवचा पराभव करून विजेतेपद पटकाविले होते, मात्र त्यानंतर मनगटाच्या दुखापतीने त्याला सातत्याने त्रस्त केले. त्यामुळे यंदाचे वर्ष हे माझ्या कारकीर्दीचे अखेरचे वर्ष असेल, असे थिएमने आधीच जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्याच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची आज सांगता झाली.
मात्र कारकीर्दीतील अखेरच्या स्पर्धेत डॉमिनिकचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. बेन शेल्टॉनने त्याचा 6-4, 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत दुसरी फेरी गाठली. सामन्यानंतर उभय खेळाडूंनी एकमेकांना जोरदार आलिंगन दिले. मग यजमान देशाच्या बेन शेल्टॉनने उपस्थित प्रेक्षकांना डॉमिनिक थिएमसाठी टाळ्या वाजविण्याचे आवाहन केले.
चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी डॉमिनिकने विजेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले होते. त्यावेळी कोरोनामुळे प्रेक्षकांची गर्दी नव्हती, मात्र 30 वर्षीय डॉमिनिक थिएमने यावेळी उपस्थित प्रेक्षकांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले. 2018 व 2019 मध्ये ऑस्ट्रियाच्या या झुंजार खेळाडूने ‘फ्रेंच ओपन’चे विजेतेपद पटकाविले होते. शिवाय 2020 च्या ‘ऑस्ट्रेलिया ओपन’चाही तो उपविजेता खेळाडू होय. आता ऑक्टोबरमध्ये व्हिएन्ना येथील स्थानिक स्पर्धेत तो टेनिस कारकीर्दीतून निवृत्त होण्याची शक्यता आहे.
सुमित नागल पहिल्या फेरीत पराभूत
हिंदुस्थानचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागलचा अमेरिकन खुल्या ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत मंगळवारी पहिल्या फेरीतच पराभव झाला. त्याला नेदरलॅण्ड्सच्या टॅलोन ग्रीक्सपूरने 6-1, 6-3, 7-6 असे पराभूत केले. पहिला सेट सहज गमाविल्यानंतर नागलने दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये जोरदार लढत दिली, मात्र आपल्याहून कितीतरी सरस क्रमवारी असलेल्या टॅलोनपुढे नागलचा निभाव लागला नाही. या हिंदुस्थानी खेळाडूची ही कारकीर्दीतील तिसरी अमेरिकन खुली स्पर्धा होय. 27 वर्षीय सुमित नागलसाठी यंदाचे वर्ष फारसे चांगले गेले नाही. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो दुसऱ्या फेरीत पराभूत झाला होता, तर फ्रेंच ओपन व विम्बल्डनमध्ये तो सलामीलाच पराभूत झाला होता.
माझ्या टेनिस कारकीर्दीतील सर्वांत मोठे यश मी याच न्यूयॉर्कच्या कोटवर मिळविलेले आहे. कोरोनाकाळातील बिकट परिस्थितीत मी ही स्पर्धा जिंकली. त्यावेळी दुर्दैवाने माझे यश पाहण्यासाठी स्टेडियममध्ये कोणीच उपस्थित नव्हते, मात्र माझ्या ग्रॅण्डस्लॅम कारकिर्दीची अखेरही याच कोर्टवर झाल्याने मी नक्कीच समाधानी आहे, असे डॉमिनिक थिएम म्हणाला.