सूर्याला कसोटीत तळपायचेय! आगामी मोसमात संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न

टी-20 क्रिकेटचा बेधडक फलंदाज असा शिक्का बसलेल्या सूर्यकुमार यादवला आपल्या क्षमतेच्या जोरावर हिंदुस्थानच्या कसोटी संघात पुन्हा आपले स्थान निर्माण करायचेय. आजवर केवळ एकच कसोटी खेळलेल्या सूर्याला आगामी मोसमात कसोटी क्रिकेटचीही टेस्ट पास करण्याची इच्छा आहे आणि तो त्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. कमी चेंडूंत अधिक धावा करणाऱ्या सूर्याच्या फलंदाजीसाठी हा खऱ्या अर्थाने कसोटीचा काळ ठरणार आहे.

आगामी मोसमात हिंदुस्थानचा संघ दहा कसोटी सामने खेळणार आहे. यादरम्यान हिंदुस्थानी संघात काही नव्या खेळाडूंनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यात श्रेयस अय्यर, सरफराज खान, के. एल. राहुल आणि रजत पाटीदारसारखे खेळाडू आधीच रांगेत आहेत आणि यांना मागे टापून कसोटी संघात स्थान मिळवणे सूर्यासाठी नक्कीच सोप्पे नसेल.

हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू जोरदार तयारी करत आहेत आणि मलाही संघात पुन्हा स्थान मिळवायची इच्छा असल्याचे सूर्याने एका वेब पोर्टलला मुलाखत देताना म्हटले. मी हिंदुस्थानी संघात पदार्पण केले, त्यानंतर मी जखमी झालो आणि संघाबाहेर फेकला गेलो, जे पुन्हा परत येऊच शकलो नसल्याचे सूर्या म्हणाला.

सूर्याने फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदुस्थानी संघात पदार्पण केले होते आणि ती त्याची पहिली आणि एकमेव कसोटी ठरलीय. गेले दीड वर्ष तो कसोटी संघाच्या आसपासही नाही. हिंदुस्थानी संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी संधी मिळताच आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केलेय. सूर्याचेही नाव या पंक्तीत बसू शकते.

सध्या सूर्या बुची बाबू स्पर्धेत खेळतोय. तो या स्पर्धेत स्वतःच्या शैलीतच खेळणार आहे. हे माझ्या नियंत्रणात नाही. आता माझ्या हातात बुची बाबू, दुलीप ट्रॉफी खेळणे आहे. या स्पर्धेत माझी बॅट कशी तळपतेय, यावर माझं पुढचं निश्चित होईल. पण दहा कसोटींचा आगामी मोसम असून मला खेळायचेय. पांढऱ्या चेंडूनंतर लाल चेंडूतही मला मनोरंजनात्मक खेळ करून दाखवायचे, असेही तो म्हणाला. सूर्याने 82 प्रथम श्रेणी सामन्यात 5682 धावा केल्या आहेत. यात 14 शतकांचाही समावेश आहे.

सूर्यासाठी नेहमीच लाल चेंडूंचे क्रिकेटच प्राथमिकता राहिलीय. जेव्हा मी मुंबईच्या मैदानात खेळू लागलो तेव्हापासून स्थानिक क्रिकेट खेळलो आणि लाल चेंडूचे क्रिकेटच खेळत होतो. तेव्हापासूनच माझे लाल चेंडूवर प्रेम जडले. आणि ते पुढेही असेल. गेल्या दहा वर्षांत मी खूप प्रथम श्रेणी सामने खेळलोय आणि आताही तेच क्रिकेट माझी पहिली आवड असल्याचेही त्याने अभिमानाने सांगितले.