ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाले असून या बातमीने अवघ्या मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 81 वर्षांच्या होत्या. बुधवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

गेली अनेक दशके त्यांनी मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्या सिनेविश्वात तब्बल 65 वर्षांहून अधिक काळ कार्यरत होत्या. त्यांनी 100 हून अधिक सिनेमात काम केले. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीचे न भरून निघणारे नुकसान झाले. मराठी मालिकांसह हिंदीतही त्यांनी उल्लेखनीय कामे केली. 2011 साली आलेल्या सिंघम सिनेमातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सुहासिनी यांनी वयाच्या 12 वर्षांपासून सिनेविश्वात काम करण्यास सुरुवात केली. मराठी सिनेमात त्यांनी मानाचं कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), आई शप्पथ (2006, चिरंजीव (2016), धोंडी (2017), छंद प्रीतीचा (2017), बकाल (2019) या सिनेमांमध्ये काम केले. रोहित शेट्टी यांचा सिंघम हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.