पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा 21 फुटी पुतळा आठ महिन्यांतच कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. पुतळा कोसळण्यास जबाबदार असलेल्या केंद्र आणि राज्यातील मिंधे सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. आज सलग दुसऱ्या दिवशीही या घटनेचे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, सोलापूर जिह्यांत तीव्र पडसाद उमटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भ्रष्ट महायुती सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भक्कम, तसेच शिवप्रेमी आणि इतिहास संशोधकांशी विचारविनिमय करून पूर्ववत उभारण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विराज पाटील, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीची गडहिंग्लज शहरात निदर्शने
गडहिंग्लज येथे महाविकास आघाडी व ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यानजीक निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारचा निषेध करीत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, काँग्रेसचे बसवराज आजरी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, माजी उपनगराध्यक्ष बंटी कोरी, युवासेनेचे अवधूत पाटील, काशिनाथ गडकरी, आनंदा माने, अनिल शिंत्रे, तेजस घेवडे, मनीष हावळ, सागर पाटील, बाबूराव माने यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कराडमध्ये दत्त चौकात काँग्रेसची निदर्शने
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या घटनेच्या विरोधात काँग्रेसतर्फे आज शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, शिवराज मोरे, मनोहर शिंदे, झाकीर पठाण, अशोक पाटील, विद्या थोरवडे, दिग्विजय पाटील, नाना जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.
सांगलीत मारुती चौकात शिवसेनेची निदर्शने
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यातही भ्रष्टाचार करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येथील मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केले. यावेळी जिल्हा संघटक बजरंग पाटील, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, युवासेनेचे ऋषिकेश पाटील, शहरप्रमुख मयूर घोडके, विराज बुटाले, रूपेश मोकाशी, चंद्रकांत मैगुरे, प्रा. सिद्धार्थ जाधव, प्रसाद रिसवडे, ओंकार देशपांडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘भ्रष्टाचाराने बरबटलेल्या भाजप आणि मिंधे सरकारला थोडी जरी नीतिमत्ता असेल, तर मुख्यमंत्र्यांसह राजीनामा देऊन हे सरकार बरखास्त करावे,’ अशी मागणी जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी केली.
नगरमध्ये शिवरायांना दुग्धाभिषेक
मालवण येथील घटनेने सरकारच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले. या घटनेला जबाबदार राज्य सरकारचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निषेध करत शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, युवासेना सहसचिव विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, दत्ता कावरे, सचिन शिंदे, परेश लोखंडे, संतोष गेनप्पा, संदीप दातरंगे, गौरव ढोणे उपस्थित होते.
राहुरी फॅक्टरी येथे आंदोलन
राहुरी फॅक्टरी येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवाजीराव कपाळे, अनिल येवले, दीपक त्रिभुवन, विष्णुपंत गीते, ललितशेठ चोरडिया, चंद्रकांत कराळे आदी उपस्थित होते.
सोलापुरात सरकारविरोधात घोषणाबाजी
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारविरुद्ध आंदोलन करण्यात आले. ‘मोदी सरकार, मिंधे सरकार हाय हाय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी नगरसेवक विनोद भोसले, राजन जाधव, माउली पवार, रकि मोहिते, श्रीकांत बापू डांगे, गणेश डोंगरे, ज्ञानेश्कर सपाटे, लहू गायककाड, सुभाष पकार, मतीन बागकान, प्रकाश ननकरे आदींसह शिवप्रेमी क श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.