महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे राज्य अस्तित्वात आहे की नाही? पुण्यातील घटनेवर सुप्रिया सुळे यांचा सवाल

बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर अशा अनेक प्रकारच्या घटना उघडकीस येत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा दाक राहिलेला नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे राज्य अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था हे गृहमंत्र्यांचे घार अपयश आहे, असा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे राज्य अस्तित्वात आहे की नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण झालीय. आता पुण्यात तरुणीचा अतिशय निर्घृण पद्धतीने खुन केल्याचे उघडकीस आले आहे. रत्नागिरी येथे एका तरुणीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली. याखेरीज पुणे परिसरातही अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आले. दुसरीकडे गुन्हेगारांना कायद्याचा कसलाही धाक राहिलेला नसून पोलीस अधिकाऱ्यांवर कोयत्याने वार केल्याची घटनाही घडली. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. हे सत्ताधाऱ्यांचे विशेषतः गृहमंत्र्यांचे घोर अपयश आहे. राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला राज्याचे गृहमंत्री जबाबदार आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.