दुष्काळामुळे खायचे हाल, नागरिकांचे पोट भरण्यासाठी वन्य प्राणी मारण्याचा या देशाचा निर्णय

आफ्रिकेतल्या नामिबिया देशात भीषण दुष्काळ पडला आहे. जनतेची भुक मिटवण्यासाठी तिथले सरकार वन्य प्राण्यांना मारणार आहे.

नामिबिया देशात वन्य प्राण्यांची समृद्धी आहे. पण या देशात भीषण दुष्काळ पडला आहे. 25 लाख लोकसंख्या असलेल्या देशात 12 लाखहून अधिक लोकांपुढे रोजच्या खाण्याचा प्रश्न पडला आहे. या दुष्काळामुळे 84 टक्के अन्नाचे साधन नष्ट झाले आहे. त्यामुळे अन्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या सरकारने 700 वन्य प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्राण्यांना मारून सरकार सामान्य जनतेला या प्राण्यांचे मांस देणार आहे.

सरकारने एकूण 723 प्राण्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 30 घोडेस 60 म्हशी, 50 काळवीट, 100 ब्लु वाईल्डबीस्ट, 300 झेब्रा, 83 हत्ती आणि 100 हरिणांचा समावेश आहे. नामिबिया सरकारने आधीच 150 हून अधिक प्राणी मारले आहेत आणि त्यातून 63 टन मांस दुष्काळग्रस्त भागात पाठवले आहे.

नामिबियात भीषण दुष्काळ पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2013, 2016, आणि 2019 मध्येही असाच भीषण दुष्काळ पडला होता. यंदा 2023 पासून बोत्सवाना भागात हा दुष्काळ पडला होता. त्यानंतर अंगोला, जाम्बिया, झिम्बाब्वे आणि नामिबियातही हा दुष्काळ पडला.