Wardha News – नवीन डीजेची तपासणी करायला गेले अन् दोघं रात्रभर तारेला चिकटले

राज्यात दहीहंडीचा उत्साह असतानाच वर्धा जिल्ह्याच्या सालोड हिरापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली. दहीहंडीच्या पूर्वसंध्येला उत्सवाच्या आनंदावर विरझण पडलं आहे. नवीन डिजेची तपासणी करायला गेलेल्या दोन तरुणांना वीजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आणि अवघ्या क्षणात होत्याचे नव्हते झाले.

सूरज चिंदूजी बावणे (27) आणि सेजल किशोर बावणे (13) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. सोमवारी गोकुळाष्टमी असल्याने दहीहंडी उत्सवाची ऑर्डर होती. नवीन आणलेल्या डिजेची तपासणी करण्यासाठी सेटअप करून विद्युत जोडणी सुरू केली. त्यासाठी विद्युत वितरण महामंडळाच्या मुख्यवाहिनीवरून थेट विद्युत पुरवठा घेण्याचा प्रयत्न करत असताना दोघांना शॉक बसला. दोघेही विद्युत तारांना चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्या विद्युत तारांना ते रात्रभर चिकटून राहिले तरी कोणालाच पत्ता लागला नाही. दोघं घरी न आल्याने कुटुंबीयांनी सकाळी शोधाशोध केली. त्यावेळी हे दोघं विद्युत तारेला लटकलेल्या अवस्थेत दिसले. याप्रकरणी सावंगी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.