हिंदुस्थान युनिलिव्हरला आयकर विभागाचा झटका, बजावली 962 कोटींची टॅक्सची नोटीस

हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीला आयकर विभागाकडून मोठा झटका बसला आहे. आयकर विभागाने 962.75 कोटी रुपयांची टॅक्सची नोटीस बजावली आहे. यामध्ये 329.3 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. या आदेशांविरोधात अपील केले जाऊ शकते. ही नोटीस बजावल्याने कंपनीच्या शेअरमध्ये घट झाली आहे.

सोमवारी एक्सचेंज फायलिंगनुसार, हिंदुस्थान युनिलिव्हरला नोटीसमध्ये सांगण्यात आले की, ही रक्कम टीडीएस कपात न केल्यामुळे लावण्यात आली आहे. जीएसके समूह संस्थांकडून हिंदुस्थान HFD IPR च्या संपादनाशी संबंधित पेमेंटसाठी 3,045 कोटी रुपये पाठवताना टीडीएस न भरल्याने कर मागणी पाठवण्यात आली आहे. 2018 मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरने जीएसकेकडून हॉर्लिक्स ब्रँड 3,045 कोटी रुपयांना विकत घेतला. यामध्ये हिंदुस्थान, बांगलादेश आणि 20 हून अधिक देशांचा समावेश आहे. या संपादनाद्वारे, बूस्ट, माल्टोवा आणि विवा सारखे इतर जीएसकेचे ब्रँड देखील हिंदुस्थान युनिलिव्हरच्या पोर्टफोलिओमध्ये दाखल झाले आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, याआधीही अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यामध्ये इंटेजिबल अॅसेटच्या मूळ स्थान त्यांच्या मालकाच्या स्थानाशी जोडलेले आहे. त्यामुळे अशा इंटेजिबल अॅसेटच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर हिंदुस्थानात कर आकारला जाऊ शकत नाही. या आदेशाविरोधात कंपनी अपील करणार आहे.