खोटे आदिवासी दाखले, आधारकार्ड आणि जमिनीचे दस्तावेज बनवून 107 एकर आदिवासींच्या जमिनीची परस्पर विक्री करण्याऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश नवी मुंबईत झाला आहे. स्वतः आदिवासी असल्याचे भासवून ही टोळी आदिवासींच्या जमिनीची विक्री करीत होती. मात्र एका व्यवहारात या टोळीने केलेल्या कागद पत्रांची चौकशी झाली असता तेबनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सहा जणांविरोधात खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सानपाडा येथील विक्रमेश इस्टेट एलएलपी या कंपनीसोबत चेतना इलपाते व त्यांचे सहकारी अमर खुराणा, जितेंद्र पुरी यांनी खालापूरातील निंबोडे येथील 107 एकर जमिनीची विक्रीसाठी करार केला. त्या बदल्यात त्यांनी दोन कोटी रुपयांची रक्कम आगाऊ घेतली. आदिवासी जमीन हस्तांतरित करून देण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने, ना हरकती, जमिनीचे दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे चेतना इलपाते यांनी आश्वासन दिले होते. मात्र जमिनीचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करत होत्या. कंपनीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली तेव्हा चेतना इलपाते यांनी ही जमीन नर्सीमुंजी एज्युकेशन ट्रस्टला विकली. त्यांनी बनावट दस्तावेज बनवून अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आल्याने विक्रमेश इस्टेटचे विक्रमसिंह पाटणकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार चेतना इलपाते, अमर खुराणा, जितेंद्र पुरी, नर्सीमुंजी ट्रस्टचे पदाधिकारी शैलेश गाजीवाला, हितेन शहा व अशोक मुंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.