एका रात्रीत सरकार बदलतं, मग बलात्काऱ्यांना फाशी का नाही? भाजपच्या दहीहंडी उत्सवात गोविंदांनी झळकावले पोस्टर

आज राज्यात गोपाळकाल्याचा उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाचा एकीकडे उत्साह जरी असला तरी राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांनी जनतेत प्रचंड अस्वस्थता आहे. जनतेच्या मनात असलेली अस्वस्थता आज गोविंदांच्या पोस्टरमधून दिसून आली आहे.

मुंबईतील वरळी येथील जांभोरी मैदानात भाजपचे नेत्यांच्या वतीने दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. या दहीहंडी उत्सवाच्यावेळी विविध ठिकाणची गोविंदा पथके इथे हजेरी लावत आहेत. अशातच एका गोविंदाने एक पोस्टर झळकावले. ज्यावर बलात्कार पीडितेंना न्याय देण्यासंदर्भात मागणी केली होती. तसेच मिंधे-भाजप सरकारला बोचणारे सवाल करण्यात आले होते. या पोस्टरवर लिहिले होते की ‘एका रात्रीत सरकार बदलते, एका रात्रीत नोटा बंद होतात. तर मग महिलांवर बलात्कार करणाऱ्या एका रात्रीत फासावर का लटकावले जात नाही? आम्हाला मेणबत्या घेऊन मोर्चे नको, तर न्याय हवा आहे’.