हा आहे 70 वर्षांचा हिशोब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा महायुती सरकारवर निशाणा

सिंधुदुर्गातील राजकोट जिल्ह्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावरून संपूर्ण राज्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. ही महायुती सरकारची निकृष्ट कामाची गॅरंटी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात 1961 साली गेट वे ऑफ इंडिया जवळ तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले होते. तो आजही तिथेच उभा आहे. हा 70 वर्षांचा हिशोब आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. तर 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा 8 महिन्यांतच कोसळला, ही महायुती सररकारच्या निकृष्ट कामांची गॅरंटी आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महाराजांचा पुतळा कोसळवून दाखवला

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारने आता निकृष्ट काम करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळवून दाखवला. महाराष्ट्राच्या आराध्यदैवताचा सातत्याने होणारा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. याचा हिशोब येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील हीच स्वाभिमान जनता चुकता करणार हे मात्र नक्की! असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.