रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, संतप्त जमावाचा रास्ता रोको; रिक्षाचालक फरार

बदलापूर येथील घटना ताजी असताना रत्नागिरीत आणखी एका लाडक्या बहिणीच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. रत्नागिरी शहरात नार्ंसगच्या विद्यार्थिनीवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त रत्नागिरीकरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रास्ता रोको केला. पोलीस निरीक्षकांना घेराव घालत किती तास झाले, अजून आरोपी का सापडत नाही? असा प्रश्न उपस्थित करताना आरोपीला लवकर पकडा आणि आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. दरम्यान लाखो रुपये खर्च करून शहरात लावलेले सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलीस आणि प्रशासन तोंडघशी पडले आहे.

नार्ंसगची ही 19 वर्षीय विद्यार्थिनी आज सकाळी सात वाजता साळवी स्टॉप येथे एका रिक्षात बसली. त्या तरुणीला शहराच्या दिशेने यायचे होते. पण त्या रिक्षाचालकाने दुसऱया दिशेला अजून दोन प्रवाशी आहेत, ते घेतो असे म्हणून रिक्षा चंपक मैदानाच्या दिशेने फिरवली. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने तिला पाणी प्यायला दिले. ती बेशुद्ध पडल्यावर तिला चंपक मैदान येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. चंपक मैदानाजवळ बेशुद्ध पडलेल्या तरुणीला काही वेळानंतर शुद्ध आली. तिने आपल्या बहिणीला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. तिच्या बहिणीने ही घटना पोलिसांना कळवली. दरम्यान, घटना घडून पाच-सहा तास उलटले तरी आरोपी अजून सापडला नव्हता. त्यामुळे नागरिक संतापले. त्यांनी पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांना घेराव घातला.

संतप्त परिचारिकांची निदर्शने

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि आरोग्य विभागातील कर्मचारी रस्त्यावर उतरले. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन निदर्शने केली व आरोपीला फाशी देण्याची मागणी केली.

29 ऑगस्टला ‘रत्नागिरी बंद’

जर दोन दिवसांत पोलिसांनी आरोपी पकडला नाही तर 29 ऑगस्ट रोजी आम्ही ‘रत्नागिरी बंद’ करू असा इशारा या वेळी नागरिकांनी दिला.

त्या अधिकाऱयांना तत्काळ निलंबित करा

शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन पीडितेच्या आईवडिलांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन साळवी म्हणाले की, साळवी स्टॉप येथील सीसीटीव्ही बंद आहेत ही शोकांतिका आहे. सीसीटीव्ही बंद पडायला किंवा त्याची देखरेख न करणाऱया पोलीस अधिकारी आणि नगरपरिषद प्रशासन अधिकाऱयांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली.